धक्कादायक! बॉयफ्रेंडने हुंडा मागितला म्हणून डॉक्टर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 07:18 AM2023-12-08T07:18:11+5:302023-12-08T07:18:33+5:30
शहानाने तणावाखाली भुलीच्या इंजेक्शनचे जास्त डोस घेऊन आत्महत्या केली
प्रियकराने केलेल्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये २६ वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिचे लग्न प्रियकराशी निश्चित झाले होते. मुलाच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून १५० तोळे सोने, १५ एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केली होती. इतका हुंडा देण्यास नकार दिल्याने मुलाच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले होते. या प्रकरणात डॉ. रुवैस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
डॉ शहाना तिरुवनंतपुरमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करत होती. तिच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. डॉ. शहानाचे डॉ. ईए रुवैस याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. शहानाचे कुटुंब ५ तोळे सोने, ५० लाख रुपयांची मालमत्ता आणि एक कार देण्यास तयार होते. पण, रुवैसच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. इतकी मोठी मागणी मान्य करू शकत नसल्याचे सांगताच रुवैसच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले. यामुळे तणावात असलेल्या शहानाने तणावाखाली भुलीच्या इंजेक्शनचे जास्त डोस घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली. त्यात ‘प्रत्येकाला फक्त पैसे हवे आहेत’, असे म्हटले आहे. सध्या ही घटना व्हायरल होत असून, नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.