26/11 मुंबई हल्ल्याचा दोषी डेव्हिड हेडलीवर शिकागो तुरुंगात जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 09:08 PM2018-07-23T21:08:18+5:302018-07-23T21:09:38+5:30
दोन कैद्यांनी हेडलीवर 8 जुलै रोजी हा गंभीर हल्ला केला; प्रकृती चिंताजनक
शिकागो - 26/11 मुंबई हल्ल्याचा आरोपी पाकिस्तानी अमेरिकी डेव्हिड कोलमन हेडलीवर अमेरिकेतील शिकागो तुरुंगात जीवघेणा हल्ला झाला आहे.या हल्ल्यात तो गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. त्याला शिकागोच्या नॉर्थ अॅवेस्टन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दोन कैद्यांनी हेडलीवर 8 जुलै रोजी हा गंभीर हल्ला केला होता.
अमेरिकी नागरिक हेडली हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसोबत काम करत होता. तो 26/11 मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे.हल्ल्यात गंभीर जखमी हेडलीला शिकागोच्या नॉर्थ अॅवेस्टन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले आहे. शिवाय त्याच्यावर 24 तास निगराणीही ठेवली जात आहे. हेडलीवर हल्ला करणारे दोघेही सख्खे भाऊ आहेत. ते दोघेही पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या आरोपात तुरुंगात आहेत. त्यांना १० वर्षांपूर्वी एका पोलिसावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरुन झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.
डेव्हिड हेडली लश्कर-ए-तोयबाचा अंडरकव्हर एजंट म्हणून काम करत होता. त्याने मुंबई हल्ल्यासाठी रेकी करून विस्तृत माहिती गोळा केली होती. त्यानेच पाकिस्तानातील लष्करच्या ट्रेनिंग कॅम्पला ती माहिती पुरवली. हल्ल्यापूर्वी त्याने भारतात येऊन हल्ल्याच्या ठिकाणांवर रेकी केली. हेडली सप्टेंबर 2006 ते जुलै 2008 दरम्यान 5 वेळा भारतात आला. हल्ल्याच्या ठिकाणांचे फोटो काढले आणि पाकिस्तानात जाऊन कट आखला. 24 जानेवारी 2013 रोजी अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने त्याला दोषी ठरवले होते. मुंबईवरील हल्ल्यासाठी त्याला 35 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.