26/11 Terror Attack : ... आणि कसाबचे 'पार्सल' रवाना झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 04:44 PM2018-11-26T16:44:55+5:302018-11-26T16:45:11+5:30
रमेश महाले यांनी उलगडले ‘आॅपरेशन एक्स’ : फाशी देण्यासाठी कसाबला नेताना पार्सल हा कोड वर्ड ठेवला होता
मुंबई - कसाबला फासावर लटकविण्यापूर्वी आर्थर रोड ते पुण्यातील येरवडा कारागहापर्यंत करण्यात आलेल्या ‘आॅपरेशन एक्स’बाबत आजवर वेगवेगळी माहिती समोर येत होती. पण कुणालाही सुगावा लागू न देता कसाबला ‘पार्सल’ ठरवून हा प्रवास कसा पार पडला, तो नव्याने उलगडला आहे.
२६/११ चे तपास अधिकारी रमेश महाले यांनी आपल्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने कसाबला फाशी सुनावल्यानंतर १९ नोव्हेंबर २०१२ ला तत्कालीन कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त सदानंद दाते यांच्याकडून त्याला फासावर चढवण्यासाठीच्या ‘आॅपरेशन एक्स’ची जबाबदारी महालेंवर सोपविण्यात आली. या आॅपरेशनमध्ये आर्थर रोड येथून कसाब म्हणजे ‘पार्सल’ला कुणाला सुगावा लागू न देता येरवड्यापर्यंत पोहोचवायचे होते.
मध्यरात्री रात्री पावणेबारा वाजता आर्थर रोड तुरुंगातून पार्सल कोठडीबाहेर काढून आॅपरेशन एक्स सुरु झाले. कसाबला काळ्या स्कॉर्पिओतून नेण्यात आले. या मोटारीची कॉलसाईन होती ‘नंबर १’. कॉलसाईन म्हणजे, बिनतारी संदेशवहनात वापरला जाणारा सांकेतिक शब्द. आर्थर रोड तुरुंगाच्या दरवाजातून हळूहळू मोटार बाहेर पडली. पुढे धावणाऱ्या स्कॉर्पिओमध्ये पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील होते. ‘फोर्स वन’चे तीन शस्त्रसज्ज जवान, एक चालक आणि एक वायरलेस आॅपरेटर त्यात होते. ही एका अर्थाने पायलट कार होती. ती कॉलसाईन नंबर २ होती.
महाले सांगतात, आमच्यावर मागून हल्ला होऊ नये म्हणून फोर्स वनचे ७ जवान, एक वायरलेस आॅपरेटर आणि एक चालक होता. तेथून प्रवासाचा पहिला टप्पा- अल्फा सुरु झाला होता. तो आर्थर रोड तुरुंग ते वाशीच्या टोल नाक्यापर्यंत होता.
तेथून प्रवासाचा दुसरा टप्पा- वाशी ते खालापूर हा- ‘ब्रेव्हो’ सुरु झाला. वाशी टोलनाक्याप्रमाणे खालापूर टोलनाकाही अडथळ्याविना पार झाला आणि ‘चार्ली’ हा तिसरा टप्पा सुरु झाला. पुण्याच्या उर्से टोलनाक्यावर चौथा टप्पा ‘डेल्टा’सुरु झाला. पुढे देहूरोड परिसरात नियंत्रण कक्षाची वायरलेस व्हॅन दिसली. आमच्या गाड्या येताना दिसताच सगळे मागे झाले आणि ‘इको’हा पाचवा टप्पा सुरु झाला. येरवडा तुरुंगापर्यंत पोहोचायला पहाटेचे दोन वाजले. येथून आर्थर रोड कारागृह ते येरवडा कारागृह या प्रवासातला शेवटचा टप्पा ’फॉक्स’ पूर्ण झाला होता.
प्रत्येक टप्पा पार पडला की, केवळ अल्फा, ब्रेव्हो, चार्ली, डेल्टा, ईको आणि फॉक्स असे त्या त्या टप्प्याला दिलेल्या सांकेतिक नावाने दाते यांच्याशी मोबाईलवर संपर्क सुरु होता आणि तेथे पोहोचल्यावर कसाबला फाशी देण्यासाठीचे ‘आॅपरेशन एक्स’ पूर्ण झाले.