26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांनी सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून आम्हाला जीवनदान दिले, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 03:48 PM2021-11-25T15:48:38+5:302021-11-25T15:50:03+5:30

Hemant Bavdhankar Praise Shahid Tukaram Omble : तुकाराम ओंबळे यांनी नुसतं कर्तृत्व नाही गाजवले. तर आम्ही उर्वरित १५ जण जिवंत राहू शकलो, ते तुकाराम ओंबळे यांच्यामुळेच. नाहीतर चित्र काही वेगळंच असले असते. सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून ओंबळे यांनी आम्हाला जीवनदान दिले, असा थरकाप उडवणारा अनुभव हेमंत बावधनकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.     

26/11 Terror Attack :Tukaram Ombale took all the firing on his own body and gave us life, otherwise ... | 26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांनी सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून आम्हाला जीवनदान दिले, नाहीतर...

26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांनी सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून आम्हाला जीवनदान दिले, नाहीतर...

googlenewsNext

पूनम अपराज

मुंबई - बघता बघता २६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उद्या १३ वर्ष पूर्ण होत आहेत. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी १० दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले आणि त्यापैकी कसाब आणि अबू इस्माईल या दोघांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षागृहात अंधाधुंद गोळीबार करून अनेक निष्पापांचे जीव घेतले. यानंतर कसाबला रात्री १२. ३० वाजताच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर जिगरबाज पोलिसांनी पकडले. या जिगरबाज पोलीस अधिकऱ्यांपैकी एक हेमंत बावधनकर. मुंबईतील वर्दळीचे आणि महत्वाच्या अशा सीएसएमटी रेल्वे स्थानकापासून २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याला सुरुवात झाली आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची धुरा देखील बावधनकर यांनी यशस्वीपणे पार पडली आहे. हा योगायोगच होता. आता हेमंत बावधनकर हे व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत.  

२६ नोव्हेंबर २००८ ला १० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत घुसून अंदाधुंद गोळीबार केला आणि निष्पापांची कत्तल केली.१६६ निष्पाप नागरिक आणि सुरक्षा रक्षकांची हत्या या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केली. १३ वर्षांनंतरही या हल्ल्याच्या भयावह आठवणी आणि जखमा अजून ताज्या आहेत. या हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल आमीर कसाब. या देशद्रोही कसाबला जिवंत पकडून देताना पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे शाहिद झाले. मात्र, गिरगाव चौपाटीवर शाहिद ओंबळे यांच्यासह संजय गोविलकर, भास्कर कदम आणि हेमंत बावधनकर मिळून १६ पोलीस कर्मचारी, अधिकारी यांचे कसाबला जिवंत पकडून देण्यात महत्वाचे योगदान असल्याचं म्हणता येईल.   

रात्री १२.३०वाजता नियंत्रण कक्षाच्या मिळालेल्या संदेशानुसार एक स्कोडा गाडी त्याठिकाणी आली. ज्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी करत होतो, त्याठिकाणापासून ५० फुटावर कसाबची स्कोडा गाडी थांबली. आम्ही गाडीचे हेडलाईट बंद करायला सांगितलं. परंतु ते तीव्र केले. वायपरवर विंड स्क्रीवर वॉटर शॉवर सुरु केले. नंतर वेगाने गाडी आमच्या दिशेने आली. ती गाडी युटर्न घेण्याच्या तयारीत असताना रोड डिव्हायडरवर धडकली आणि थांबली. मी आणि माझे सहकारी भास्कर कदम ड्रायव्हरच्या दिशेने त्यांना ताब्यात घ्यायला गेलो. तेव्हा त्या गाडीचा चालक अतिरेकी होता अबू इस्माईल याने आमच्यादिशेने गोळीबार केला. त्यावेळी आमचे सहकारी भास्कर कदम यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून त्या अतिरेक्याला प्रत्युत्तर देत गोळीबार करून अबू इस्माईलला जखमी केले. कसाब जो होता गाडीत डाव्याबाजूला बसलेला, त्याने दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला. त्याचवेळेला त्याला घेराव घालायला आमचे सहकारी संजय गोविलकर आणि तुकाराम ओंबळे येत होते, तेव्हा कसाबने एके ४७ मधून गोळीबार केला. त्यात तुकाराम ओंबळे गंभीर जखमी झाले. दुर्दैवाने उपचारादरम्यान तुकाराम ओंबळे शहिद झाले. तुकाराम ओंबळे यांनी नुसतं कर्तृत्व नाही गाजवले. तर आम्ही उर्वरित १५ जण जिवंत राहू शकलो, ते तुकाराम ओंबळे यांच्यामुळेच. नाहीतर चित्र काही वेगळंच असले असते. सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून ओंबळे यांनी आम्हाला जीवनदान दिले, असा थरकाप उडवणारा अनुभव हेमंत बावधनकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.     

Web Title: 26/11 Terror Attack :Tukaram Ombale took all the firing on his own body and gave us life, otherwise ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.