गोव्यात महिनाभरात रस्ता अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 09:28 PM2019-05-20T21:28:06+5:302019-05-20T21:29:42+5:30
सहा पादचाऱ्यांचा समावेश
पणजी - एप्रिल महिन्यात राज्यभरात रस्ता अपघातांमध्ये २७ बळी गेले. यात सहा पादचारी तसेच एका सायकलस्वाराचा समावेश आहे. १ जानेवारीपासून ३0 एप्रिलपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात रस्ता अपघातांमध्ये ९७ बळी गेले.
वाहतूक खात्याकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार महिनाभरात २८४ अपघातांची नोंद झाली. यातील २४ अपघातांमध्ये बळी गेले. उत्तर गोव्यात ६ आणि दक्षिण गोव्यात १८ असे अपघात घडले. १७ अपघातांमध्ये गंभीर इजा झाल्या. उत्तर गोव्यात ६ तर दक्षिण गोव्यात ११ असे अपघात घडले. ७१ अपघात किरकोळ स्वरुपाचे होते. १७३ अपघातांमध्ये कोणालाही इजा झाली नाही. २७ बळींमध्ये उत्तर गोव्यातील अपघातांमध्ये ६ तर दक्षिण गोव्यात २१ जणांनी प्राण गमावले. यात ११ वाहनचालक, ६ पादचारी, ७ प्रवासी, १ सायकलस्वार व इतरांचा समावेश आहे. १६ जणांना गंभीर इजार झाल्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७२६ जणांना वाहतूक खात्याने चलन दिले. उल्लंघनांविरुध्द पोलिसांनी आरंभलेल्या खास मोहिमेत पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली.
- वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर केल्या प्रकरणी २७६ जणांविरुध्द गुन्हे नोंदविले.
- निष्काळजीपणे आणि वेगाने वाहन हाकल्या प्रकरणी ५४४ जणांविरुध्द गुन्हे नोंद झाले.
- मद्यपान करुन वाहन चालविल्या प्रकरणी ५१९ जणांविरुध्द गुन्हे नोंद झाले.
- काळ्या काचांचे वाहन वापरल्या प्रकरणी ४५२४ जणांविरुध्द गुन्हे नोंदविले.