खून करून मृतदेह जाळला, अखेरच्या कॉलनं हत्येचा उलगडा; २४ तासांत आरोपी सापडला
By राजकुमार जोंधळे | Published: April 5, 2024 11:44 PM2024-04-05T23:44:00+5:302024-04-05T23:45:08+5:30
तिघांविरुद्ध गुन्हा : खाेपेगाव शिवारातील घटना
लातूर : लॉजवर डे-नाईट ड्युटी कर नाही तर उचल घेतलेले पैसे परत दे, असे म्हणून एका २८ वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना खोपेगाव शिवारात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरातील औसा रोडवरील एका लॉजवर सचिन राजू लामतुरे (२८, रा. निटूर, ता. निलंगा) हा काम करीत होता. दरम्यान, दिगंबर साबणे याच्यासह अन्य दोघांनी सचिनला लॉजवर डे-नाईट ड्युटी करण्यासंदर्भात तगादा लावला. सचिनने त्यास नकार दिला. त्यावरून डे-नाईट ड्युटी कर, नाही तर उचल घेतलेले पैसे परत कर, या कारणावरून छत्रपती चौक ते कव्हा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळल्याच्या स्थितीत आढळून आला. पहिल्यांदा अनोळखी मृतदेह म्हणून ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. विवेकानंद चौक ठाण्याचे पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ओळख पटवून आरोपीचा शोध घेतला. याबाबत राजू बाबुराव लामतुरे यांच्या तक्रारीवरून दिगंबर साबणे याच्यासह अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका आरोपीला अटक केली आहे.
शेवटच्या फोन कॉलने झाला खुनाचा उलगडा...
खाेपेगाव शिवारातील कव्हा राेडवर एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, या खून प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस व स्थागुशाने तपासाची चक्रे गतिमान केली. मयत सचिन लामतुरे याच्या मोबाइलवर शेवटचा कॉल कोणाचा होता, याचा शोध घेतला. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. इतर दोन अनोळखी आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल. अवघ्या २४ तासांत खुनाचा उलगडा करण्यात यश आले. - वैजनाथ मुंडे, पोलिस निरीक्षक, लातूर.