सिंचन घोटाळ्यात २८ वा गुन्हा दाखल : एसीबीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 09:34 PM2020-03-11T21:34:18+5:302020-03-11T21:36:24+5:30
गोसेखुर्द घोटाळ्यात बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ८.५५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोसेखुर्द घोटाळ्यात बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ८.५५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सिंचन विभागातील पाच अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे. गोसेखुर्द घोटाळ्यातील हा २८ वा गुन्हा आहे.
गोसेखुर्द घोटाळ्यातील आरोपीत तत्कालीन कार्यकारी अभियंता केशव चंद्रकांत तायडे, तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय लक्ष्मण खोलापूरकर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सोपान रामराव सूर्यवंशी, तत्कालीन कार्यकारी अधिकारी रोहिदास मारुती लांडगे आणि वरिष्ठ लेखा अधिकारी धनराज आत्माराम नंदागवळी यांचा समावेश आहे. नुकताच दाखल झालेला गुन्हा गोसेखुर्द डाव्या कालव्याच्या ६ ते ३० किलोमीटरच्या अस्तरीकरणाच्या कामाशी निगडित आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेत गोंधळ होऊन त्यात जलसंपदा विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांची भूमिका असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाचा एसीबीची नागपूर शाखा तपास करीत होती. तपासात आरोपींनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून अवैधरीत्या निविदा कामांचे दर ८.५५ कोटीने वाढविल्याचा खुलासा झाला. या कामात वित्त व नियोजन मुंबईचे प्रधान सचिवांची मंजुरी घेणे आवश्यक होते. तरीसुद्धा विदर्भ सिंचन विभागाचे कार्यकारी संचालकांनी आपल्यास्तरावर या निविदेला मंजुरी दिली. एसीबीने या कामाची तपासणी केली असता त्यांना आरोपी अधिकाºयांचे लागेबांधे असल्याची माहिती समजली. त्याआधारे एसीबीने बुधवारी आरोपींविरुद्ध सदर ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गोसेखुर्द घोटाळ्यात आतापर्यंत २८ गुन्हे दाखल झाले आहेत. यात २०० कोटींच्या फसवणुकीची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात अधिकारी आणि कंत्राटदारांसह ३० जणांना आरोपी बनविण्यात आले आहे. यात अनेक अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. काही अधिकाºयांचा मृत्यूही झाल्याची माहिती आहे. या घोटाळ्यामुळे काही दिवसांपूर्वी राजकीय वातावरणही तापले होते. यात आणखी एक गुन्हा दाखल झाल्यामुळे गोसेखुर्द घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. ही कारवाई अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मिलिंद तोतरे, मनोज कारनकर, गजानन गाडगे, विकास गडेलवार यांनी केली.