सामूहिक बलात्कार प्रकरणी ३ आराेपींना अटक; दाेघे अल्पवयीन, सीबीआय चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 06:21 AM2022-06-05T06:21:52+5:302022-06-05T06:22:06+5:30
सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशीही मागणी भाजपने केली तर, हे प्रकरण दडपले जाऊ नये म्हणून सर्वपक्षीय बैठक आयोजिण्यात यावी असे काँग्रेसने म्हटले आहे.
हैदराबाद : तेलंगणातील हैदराबाद येथे काही दिवसांपूर्वी मर्सिडीज कारमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना अटक केली आहे. त्यातील एक जण हा मुख्यमंत्री के.आर. चंद्रशेखर राव हे प्रमुख असलेल्या तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षाच्या नेत्याचा मुलगा आहे. सदुद्दीन मलिक असे एका आराेपीचे नाव आहे.
सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशीही मागणी भाजपने केली तर, हे प्रकरण दडपले जाऊ नये म्हणून सर्वपक्षीय बैठक आयोजिण्यात यावी असे काँग्रेसने म्हटले आहे. सामूहिक बलात्कार करण्यात एआयएमआयएम या पक्षाच्या एका नेत्याच्या मुलाचाही सहभाग असल्याचा आराेप भाजपने मुख्यमंत्री राव यांना पाठविलेल्या खुल्या पत्रातून केला आहे.
पीडित मुलीवर मानसिक आघात
पोलिसांनी सांगितले की,तिच्या वडिलांनी ३१ मे रोजी सामूहिक बलात्कार प्रकरणी तक्रार नोंदविली. बलात्कारानंतर पीडित मुलीवर मोठा मानसिक आघात झाल्याने ती काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने जबाब दिल्यानंतर आम्ही कारवाईला सुरुवात केली.
तक्रार नोंदविण्यास उशीर का झाला?
सामूहिक बलात्कार २८ मे राेजी झाला. मात्र, तक्रार नोंदवून घेण्यास तीन दिवस का,लागले याबाबतचे स्पष्टीकरण राष्ट्रीय बाल हक्क रक्षण आयोगाने हैदराबाद पोलिसांकडून मागविले आहे. अल्पवयीन मुलांना प्रवेश देणाऱ्या हैदराबादमधील पबच्या विरोधातही एफआयआर दाखल करावा अशी सूचना आयोगाने पोलिसांना एका पत्राद्वारे केली आहे.