७६ अब्जाची नोट घेऊन शोधत होते सावज; आंध्रातील तिघांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 06:16 AM2022-03-30T06:16:20+5:302022-03-30T06:16:33+5:30

मोठे रॅकेट असण्याची शक्यता

3 arrested who was looking for a 76 billion note | ७६ अब्जाची नोट घेऊन शोधत होते सावज; आंध्रातील तिघांना पकडले

७६ अब्जाची नोट घेऊन शोधत होते सावज; आंध्रातील तिघांना पकडले

Next

नांदेड : भारतीय चलनात तब्बल ७६ अब्ज रुपये किंमत असलेली १ बिलियन डॉलरची नोट देण्याचे आमिष दाखवून गंडविण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुद्वारा परिसरातून अटक केली. पाचपैकी तिघे अटकेत असून, दोघे जण फरार झाले आहेत. आंध्रातील हे आरोपी वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्रातील नागरिकांना फसविण्याचे फंडे वापरत आहेत. 

आंध्रातील पाच जण नांदेडात बनावट विदेशी चलन घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली होती. त्यानंतर, सपोनि पांडुरंग भारती हे या आरोपींच्या मागावर होते. गुरुद्वारा परिसरात एक बिलियन डॉलरची नोट देऊन भारतीय चलन घेण्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने महेश इल्लय्या वेल्लूटला रा.सर्वापूर जि.कामारेड्डी, नंदकिशाेर गालरेड्डी देवारमरा रा.इब्राहिमपेठ आणि आनंदराव अय्यन्ना गुंजी रा.नेकूनबाबू या तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या जवळील एक बिलियन डॉलरची बनावट नोट जप्त करण्यात आली. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

गुरुद्वारा परिसरात शोधत होते मध्यस्थ 
गुरुद्वारा परिसरात हे आरोपी एका मध्यस्थाच्या शोधात होते. गुरुद्वारात एक बिलियन डॉलरची नोट दानात आली असून, अमेरिकेत जाऊन ती वठवून घ्यावी. त्या बदल्यात भारतीय चलनात काही रक्कम उकळण्याचा त्यांचा डाव होता, परंतु त्यासाठी त्यांना कुणीच मध्यस्थ मिळाला नाही. मध्यस्थाचा शोध सुरू असतानाच ते पोलिसांच्या हाती लागले. 

पैशांचा पाऊस, गुप्तधनाचे व्हिडीओ 
आरोपींकडून पोलिसांनी मोबाइल जप्त केले आहेत. त्यामध्ये लोकांना गंडविण्यासाठी ते अनेक फंडे वापरत असल्याचे दिसून आले. त्यात पैशांचा पाऊस पाडणे, गुप्तधन शोधून देणे, मांडुळाचा प्रयोग यासह झटपट पैसे कमाविण्याचे अनेक व्हिडीओ त्यांनी तयार केले होते. 
हे व्हिडीओ लोकांना दाखवून अगोदर त्यांचा विश्वास संपादन करावयाचा अन् नंतर गंडवायचे, असा त्यांचा प्लान होता. यामागे मोठे रॅकेट असल्याचे सपोनि पांडुरंग भारती यांनी सांगितले.

Web Title: 3 arrested who was looking for a 76 billion note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.