भिवंडीत 3 घरफोडीच्या घटना उघड, 5 जणांना मुद्देमालासह अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:59 PM2022-03-03T23:59:25+5:302022-03-04T00:00:01+5:30
या घरफोडीच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.
भिवंडी : भिवंडीत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच नारपोली पोलिसांनी तीन घरफोडीच्या घटनांची उकल करून चोरीला गेलेल्या ४० लाखांच्या मुद्देमालासह ५० लाखांचे दोन आयशर टेम्पो असा एकूण ९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या घरफोडीच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.
नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील गोडाऊनचे लोखंडी शटर उचकटून गोदाम मध्ये ठेवलेल्या सुमारे १६ लाख ९३ हजार रुपये किमतीचा १४ टन ५०० किलो वजनाचा प्लास्टिक दाण्याचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १७ डिसेंबर रोजी घडली होती. त्याचबरोबर १४ फेब्रुवारी रोजी वळगाव येथील कृष्णाबाई कंपाऊंड मध्ये असलेल्या पियू केम इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोडाऊन शटर उघडून सुमारे १९ लाख ७६ हजार ५५५ रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या केमिकल पावडरचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. तर ७ फेब्रुवारी दरम्यान राहनाळ गावातील श्री साई सद्गुरू कंपाऊंडमधील सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनच्या भिंतीला होल पाडून आत प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे ६ लाख ५० हजार १८० रुपये किमतीचा प्लास्टिक दाण्याचा माल चोरून नेला होता. या तिन्ही चोरीच्या घटनांची नोंद नारपोली पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
नारपोली पोलिसांनी तांत्रिक माहिती तसेच गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता या तीन घरफोडी प्रकरणी मोहंमद सिकंदर ऊर्फ शाहरुख मुस्तकीम चौधरी वय २१ परवेज मकसूद आलम खान वय ३९ जाकीर जाहिद खान वय ३१ लोकेश हेमराज बोरा वय ४० सलीम अहमद जब्बार अहमद अन्सारी वय ४७ अशा पाच जणांना अटक केली असून या तिन्ही गुन्ह्यातील सुमारे चाळीस लाख चार हजार एकशे दहा रुपयांचा प्लास्टिक दाणा व ग्राफाईट पावडर असा मुद्देमाल व पन्नास लाख किमतीचे दोन आयशर टेम्पो असा एकूण ९० लाख ४ हजार ११० रुपये किंमतीचा मुद्देमाल नारपोली पोलिसांनी हस्तगत केला आहे.