लाखाच्या बदल्यात ३ लाख; नोटा छापणारी टोळी जेरबंद, १ कोटी १४ लाखांच्या बनावट नोटाही जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 09:20 AM2023-02-03T09:20:23+5:302023-02-03T09:20:45+5:30
Fake Notes: रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी भांडणाऱ्या टोळीकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे एक कोटी १४ लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांच्या टोळीला ताब्यात घेतले.
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी भांडणाऱ्या टोळीकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे एक कोटी १४ लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. हा प्रकार बुधवारी रात्री घडला.
औंढा नागनाथ येथील पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे हे बुधवारी रात्री शहरात पेट्रोलिंग करत होते. एक गाडी ग्रामीण रुग्णालयाजवळ दिसली. यावेळी १ महिला व सहा जण आपसात वाद करीत होते. संशय आल्यामुळे पोलिसांनी त्यांची व गाडीची तपासणी केली. तपासणीवेळी त्यांच्याजवळ ३९ लाख रुपये आढळले. परंतु एका महिलेने १२.५० लाख रुपये देऊन मला ३९ लाख रुपयांच्या बनावट नोटा देऊन गाडीने पसार झाल्याचे पोलिस निरीक्षक झुंजारे यांना सांगितले.
गाडीचा पाठलाग...
- झुंजारे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गाडीचा पाठलाग करून मोबाइल ट्रॅकद्वारे खामगाव येथून ३ आरोपींना ताब्यात घेतले.
- त्यांच्याकडूनही ७५ लाख रुपये बनावट नोटा जप्त केल्या. अशा १ कोटी ४० लाख रुपयांच्या बनावट नोटांसह ९ आरोपीस औंढा पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्व आरोपी हे लातूर, औरंगाबाद, नांदेड, खामगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती गुरुवारी सकाळी दहा वाजता प्राप्त झाली.
- या प्रकरणात हैदराबाद, मध्य प्रदेश (इंदोर) येथील आरोपींचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.