पंजाबच्या ३ कुख्यात शार्प शूटरना कल्याणमध्ये अटक, भाड्याने खोली करुन राहायचे
By मुरलीधर भवार | Published: January 9, 2023 05:54 PM2023-01-09T17:54:12+5:302023-01-09T17:55:08+5:30
पंजाबमध्ये मख्खन सिंगची हत्या करुन झाले होते पसार, मोहन्यात खोली घेऊन होते वास्तव्याला
कल्याण- पंजाब राज्यातील माखन सिंग यांची हत्या करुन पसार झालेले तीन शार्प शूटर कल्याणनजीकच्या मोहने परिसरात भाड्याची खोली घेऊन राहत असल्याची माहिती कळताच पोलिसांनी तिन्ही शार्प शूटरना आज पहाटेच्या सुमारास सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या तिन्ही शार्प शूटरची नावे शिवम सिंग, गुरुमूख सिंग आणि अमनदीप कुमार अशी आहेत. पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्स, मुंबई एटीएस आणि खड़कपाड़ा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या तिघांना अटक केली आहे. हे तिघेही खत्री गॅंगशी संबंधित आहेत.
शिवम सिंग, गुरुमुख सिंग, अमनदिप कुमार हे तिघे शार्प शूटर पंजाब मधील मख्खन सिंग यांचे हत्या करून कल्याण जवळील मोहने परिसरात लपून बसले होते. हे तिघे पंजाबमधील खत्री गँग चे सदस्य आहेत. मोहने परिसरात हे तिघेही खोली घेऊन राहत होते. ते लपून बसले होते. पंजाब पोलिसांनी ही माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. मुबई पालिसांनी ही माहिती एटीएसला दिली. एटीएस आणि कल्याण खडकपाडा पोलिसांनी सापळा रचला. तब्बल दोनशे पोलिसांनी मोहने परिसरात धाड टाकून परिसर घेरून धरला. त्यानंतर या तिघांना पकडण्यात आले. आज पहाटे चार वाजता ही मोहिम फत्ते करण्यात आली.
या कारवाईत खडकपाडा पोलिसांची भूमिका महत्वाची ठरली. पंजाबमधील मख्खन सिंग याची हत्या झाली होती. हत्येपश्चात मारेकरी पसार झाले हाेते. पंजाब पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मनदीप सिंग याला प्रथम अटक केली. अटकेपश्चात मनदिप सिंगने हत्या प्रकरणात अन्य तीन जणांचा समावेश असून त्यांची नावे सांगितले. ते कुठे असल्याचा कयास बांधला. त्यानुसार पोलिसानी या तिघांचा सुगावा काढला. या तिघांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यानंतर त्यांचा ट्रान्झीस्ट रिमांड घेऊन त्यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
एखाद्या व्यक्तीला घर भाड्याने देण्यापूर्वी त्याचा वास्तव्याचा करार करुन त्याची माहिती संबंधित हद्दीतील पोलिस ठाण्यास द्यावी लागते. कल्याण डोंबिवली हद्दीत आणि शहराला लागून असले्ल्या परिसरातील अनेक चाळी वजा घरात अनेक भाडेकरु राहतात. त्यात तुमच्या शेजारी असे शार्प शूटर तर वास्तव्य करुन नाहीत ना याची शहा निशा प्रत्येक जबाबदार नागरीकाने करुन त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. अन्यथा भाड्याने घर देणारे आणि त्यांच्या शेजारी राहणारे यांच्या जिवावर एखादी घटना बेतू शकते. तसेच त्यांनाही अनूचित घटनेचे शिकार होण्याची वेळ येऊ शकते अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ते या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले आहे.