लेडी डॉन! ३ बहिणींनी मिळून भररस्त्यात युवकाला मारलं; कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 02:55 PM2022-02-24T14:55:49+5:302022-02-24T14:56:16+5:30
व्हायरल व्हिडीओत ३ मुली एका युवकाला भररस्त्यात दांडक्याने मारहाण करत असल्याचं दिसून येते. या व्हिडीओच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
आझमगड – सोशल मीडियावर कधी कुठली गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. एका व्हायरल व्हिडीओ, फोटोमुळे कुणी रातोरात स्टार बनतं तर कुणालाही व्हायरल झालेल्या गोष्टीमुळे अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं. सध्या उत्तर प्रदेशातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ३ मुली एका मुलाला मारहाण करत असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं पोलिसांनाही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आहे.
व्हायरल व्हिडीओत ३ मुली एका युवकाला भररस्त्यात दांडक्याने मारहाण करत असल्याचं दिसून येते. या व्हिडीओच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. या व्हिडीओत जो युवक मार खातोय त्याचं नाव नीरज निषाद असं आहे. तो एका गॅरेजमध्ये काम करतो. त्यानेच हा व्हिडीओ शूट केला आहे. या घटनेच्या १ दिवस आधी नीरज दुचाकीवरुन सिधारीच्या दिशेने जात होता. त्यावेळी रस्त्यात आलेल्या एका वळूनं त्याच्यावर हल्ला केला. स्वत:ला वाचवण्यासाठी तो दुसरीकडे वळाला आणि एका सायकलस्वाराला धडकला.
सायकलस्वार आणि नीरज यांच्यात भांडण झालं. दोघांमध्ये मारहाण झाली. काही वेळाने हे प्रकरण मिटलं. दोघंही आपापल्या रस्त्याने निघून गेले. सायकलस्वार जेव्हा घरी पोहचला तेव्हा त्याने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून त्याच्या ३ बहिणींना संताप अनावर झाला. त्यांनी स्कूटी काढून नीरजचा शोध घेण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. काही वेळाने मातबरगंज परिसरात नीरज त्यांना सापडला. त्यानंतर तिन्ही बहिणींनी दांडक्याने नीरजला शिविगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना नीरजनं त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. या हायवॉल्टेज ड्रामानंतर आसपासच्या लोकांच्या मध्यस्थीने तडजोड करण्यात आली. प्रकरण शांत झालं.
परंतु या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे परिसरात चर्चा झाली. पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओची दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली. पीडित युवकाचा आरोप आहे की, या मुलींना जातिवाचक शिविगाळ करत मला मारहाण केली. माझं कुणीही ऐकलं नाही. मी मुलगा आणि त्या मुली असल्याने काहींनी न विचार करता त्यांनाच साथ दिली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं आता त्या मुलींना शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे असं त्याने सांगितले.