केअरटेकर संस्थेच्या निष्काळजीमुळे ३ बळी; सेप्टिक टॅन्कमध्ये घुसमटून कामगारांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 07:36 AM2022-03-11T07:36:02+5:302022-03-11T07:36:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चारकोपमध्ये पालिकेच्या स्वच्छतागृहाच्या अर्धवट भरलेल्या सेप्टी टँकमध्ये घुसमटून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चारकोपमध्ये पालिकेच्या स्वच्छतागृहाच्या अर्धवट भरलेल्या सेप्टी टँकमध्ये घुसमटून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला असून केअरटेकर संस्थेच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यानुसार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
चारकोपच्या एकता नगरमध्ये आर दक्षिण विभागाने हे शौचालय दोन महिन्यांपूर्वी बांधले. त्याच्या देखभालीचे कंत्राट न्यू एकता वेल्फेअर सोसायटी या संस्थेला देण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी स्वच्छतागृहाचा टँक स्वच्छ करण्यासाठी संस्थाचालकाने तीन खासगी सफाई कामगारांना आणले. सफाई करण्यासाठी एकजण खाली उतरला तर दोघे वर होते. मात्र, बराच वेळ तो वर आला नाही म्हणून ते दोघे त्याला शोधण्यासाठी खाली गेले. त्यावेळी आत घुसमटून त्या तिघांचाही मृत्यू झाला.
दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तिसऱ्याचा मृतदेह अग्निशमन दलाने संध्याकाळी शोधून बाहेर काढला. स्थानिकांनी कांदिवली पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. टँक उघडल्यावर काही तास तो तसाच ठेऊन त्यातील गॅस निघून गेल्यानंतर आत जाणे, त्यासाठी शिडीचा वापर करणे अशा गाईडलाईन्सचे पालन करणे आवश्यक होते जे केले गेले नसल्याचाही आरोप होत आहे.
पालिकेला
पत्र दिले
कामगारांची ओळख तसेच नेमके ते कोणाची माणसे होती याची माहिती अद्याप मिळालेली नसून ती मागण्यासाठी आम्ही पालिकेला पत्र दिले आहे.
- दिनकर जाधव
- वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांदिवली पोलीस ठाणे
टँक संस्थेच्या रिस्कवर उघडला
स्वच्छतागृहाची काळजी घेण्यासाठी असलेल्या केअरटेकर संस्थेने स्वतःच्या रिस्कवर टँक उघडला आणि त्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्व पाळली नाहीत. सदर टँक हा जवळपास चार ते पाच फूट रिकामा असल्याने तो उघडण्याची नेमकी काय गरज भासली याबाबतची चौकशी सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी आम्हाला दिलेल्या पत्राचे उत्तर आम्ही त्यांना देणार आहोत.
- संध्या नांदेडकऱ सहायक पालिका आयुक्त, आर/दक्षिण विभाग
स्वच्छतागृहाचा टँक स्वच्छ करण्यासाठी संस्थाचालकाने तीन खासगी सफाई कामगारांना आणले. सफाई करण्यासाठी एकजण खाली उतरला तर दोघे वर होते. मात्र, बराच वेळ तो वर आला नाही म्हणून ते दोघे त्याला शोधण्यासाठी खाली गेले. त्यावेळी आत घुसमटून त्या तिघांचाही मृत्यू झाल्याचे आढळले.