३० कोटींचे जीएसटी रॅकेट उद्ध्वस्त; राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 06:24 AM2023-11-03T06:24:42+5:302023-11-03T06:24:52+5:30
बोगस कंपन्या स्थापन केल्याचीही माहिती उजेडात
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य वस्तू व सेवा कर विभागाने केलेल्या तीन स्वतंत्र कारवायांतून बनावटरित्या ३० कोटी रुपयांचे इनपुट क्रेडिट प्राप्त केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. या तीनही कंपन्यांनी बनावटरित्या पैसे पदरात पाडून घेण्यासाठी एकूण २७ बोगस कंपन्या स्थापन केल्याचीही माहिती उजेडात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी पहिल्या प्रकरणात एका जीएसटी कर व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून त्याचे नाव सौरभ बुराड असे आहे. त्याने, ९ बोगस कंपन्याची स्थापना करत व त्यांची जीएसटी प्रमाणपत्रासाठी बनावटरित्या नोंदणी केली होती. बोगस व्यवहार दाखवत त्यावर त्याने १० कोटी ३६ लाख रुपये इनपुट क्रेडिटपोटी प्राप्त करून घेतले. तर दुसऱ्या प्रकरणात मे. मॅजिकगोल्ड कंपनीची संचालक भारती कोठारी हिने देखील याच पद्धतीने बनाव रचत १६ कोटी ९७ लाख रुपयांचे बनावट जीएसटी इनपूट क्रेडिट मिळवले होते.
१० नोव्हेंबरपर्यंत कोठडी
- तिसऱ्या प्रकरणात, अरुण चव्हाण नावाच्या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याने बनावट व्यवहारांची बिले सादर करत ११ कोटी १० लाख रुपये मिळवले होते.
- या तीनही प्रकरणात प्रत्येकाने ९ बोगस कंपन्या स्थापन केल्या होत्या. त्याद्वारे व्यवहार झाल्याचे दाखवत हे पैसे सरकारी तिजोरीतून लाटले आहेत. या तिघांनाही अटक करत न्यायालयात हजर केले असता त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.