बनावट दस्तावेजाच्याआधारे जमिनीचा व्यवहार करून घातला ३० कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 08:35 PM2019-12-16T20:35:49+5:302019-12-16T20:38:06+5:30
दोघांवर गुन्हा दाखल
मुंबई - बनावट दस्तावेज तयार करून त्याद्वारे जमिनीचा व्यवहार करून तब्बल ३० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या विकासक आणि त्याचा भागीदार अशा दोघांवर अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आर्थिक गैरव्यवहार असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली.
फिर्यादी बिपीन तलाक्षी मकडा, राहणारे शंकर मठ्ठम रोड ,पलई हाऊस माटुंगा, मुंबई बिपिनच्या वडिलांची मालकीची दलिया इंडस्ट्रियल इस्टेट नावाची कंपनी सुरु होती. मात्र तलाक्षी मकडा यांच्या निधनाने वडिलोपार्जित मालमत्ता हि बिपीन याच्या मालकीची झाली. मात्र मकडा चालवीत असलेली कंपनीत सात भागीदार होते. त्यात गुन्हा दाखल झालेल्या विकासक हिरजी केनियाचा समावेश आहे. फिर्यादीच्या वडिलांच्या सुरु असलेल्या कंपनीच्या माध्यमातून विविध ठिकाणी इमारती बांधून त्याच्या सदनिका विकण्याचा व्यवसाय सुरु होता. १९७२ वर्षात हिरजी यांनी कंपनीच्या नावे ओशिवरा परिसरात सव्वाचार चौरस मीटरचा जमिनीचा काही भाग खरेदी केला होता.
कंपनीच्या इतर भागीदार हे त्यांच्या कामात व्यस्त असल्याने जमिनीच्या व्यवहाराची आणि देखभालीची जबाबदारी हि हिरजी केनिया यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यासाठी कंपनीकडून हिरजी याना पॉवर ऑफ अॅटॉर्नी देण्यात आली होती. विविध जमिनीच्या रस्त्यासाठी भूखंड राखीव करणे, प्लॉट पालिकेकडून हस्तांतरण करणे, जमिनीचा मिळणार टीडीआर मिळवणे आदी कामे सोपविण्यात आली होती. मागील वर्षी कंपनीच्या मालकीचा प्लॉट हा बिल्डर असलेल्या मुकेश मेहता यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. त्या जमिनीबाबत शहानिशा केली असता दस्तावेज तपासले असता मेहतांकडे असलेल्या करारावर हिरजी आणि जितेंद्र मकडा या दोन भागीदारांच्या नावाचा उल्लेख होता. कंपनीची जागा असतानाही अन्य कंपनीच्या भागीदारी संमतीने घेतली.
ओशिवरा येथील जमिनीचे बनावट दस्तावेज बनवून तब्बल ३० कोटींचा गंडा घातल्याचे माहिती उघड होत आहे. २००८ साली खरेदी आणि जमीन विक्रीचे दस्तावेज तयार करण्यात आलेले होते. मात्र, ते १९७९ स्टॅम्प ड्युटी न भरता शासनाची फसवणूक केल्याचे समोर येताच बिपीन मकडा यांनी अंबोली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यांनतर अंबोली पोलीस ठाण्यात मुकेश मेहता आणि हिरजी केनिया या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनी बनावट कंपनीचे दस्तावेज बनवून शासनाची ३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असून त्याचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. हिरजी आणि मुकेश यांचा लवकरच जबाब नोंदवून त्यांच्यावर फसवणूक प्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.