सीम कार्ड ब्लॉक करून खात्यातून ३० लाख गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:47 PM2019-05-17T17:47:45+5:302019-05-17T17:52:01+5:30
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - सीम कार्ड ब्लॉक करून आॅनलाइन ठगांनी व्यावसायिकाच्या खात्यातून ३० लाख रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगावमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार व्यावसायिक किशोर नागडा यांची यात फसवणूक झाली आहे. त्यांच्या भागीदारीमध्ये असलेल्या कंपन्यांचा सर्व व्यवहार आॅनलाइन पद्धतीने होता. संबंधित बँक खात्यांना त्यांचा मोबाइल क्रमांक जोडला आहे. त्यामुळे सर्व व्यवहारांचा तपशील त्यांना संदेशाद्वारे मिळतात. ५ आणि ७ मे रोजी त्यांच्या मोबाइलचे अचानक नेटवर्क गेले. त्यांनी याबाबत तक्रारही दिली. नेटवर्क येताच बँकेचे आॅनलाइन व्यवहार सुरू केले. त्यातही आॅनलाइन व्यवहार होताना अडचणी निर्माण झाल्या. त्यांनी बँकेकडे चौकशी केली तेव्हा व्यवहार झाल्याचे बँकेने सांगताच त्यांना धक्का बसला. चौकशीत त्यांच्या खात्यातून तब्बल ३० लाख रुपये काढण्यात आले होते.