कवडीपाटजवळ ३० लाखांचा गुटखा जप्त, ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 01:31 AM2018-11-08T01:31:23+5:302018-11-08T01:31:32+5:30
कदमवाकवस्ती येथील कवडीपाट (ता. हवेली) टोलनाक्यावर सोलापूरच्या बाजूने येणाऱ्या टेम्पोमध्ये २९ लाख ६६ हजार रुपयांचा गुटखा लोणी काळभोर पोलिसांनी पकडला.
कदमवाकवस्ती - येथील कवडीपाट (ता. हवेली) टोलनाक्यावर सोलापूरच्या बाजूने येणाऱ्या टेम्पोमध्ये २९ लाख ६६ हजार रुपयांचा गुटखा लोणी काळभोर पोलिसांनी पकडला.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.६) रोजी सकाळी सातच्या सुमारास कवडीपाट कदमवाकवस्ती गावाच्या हद्दीत कवडीपाट टोलनाका येथे सोलापूरकडून पुण्याकडे एक शेंदरी रंगाचा आयशर टेम्पो (टीएस १२, यूए ५५७२) यामध्ये अवैध गुटखा पान मसाल्याची वाहतूक करीत आहेत, अशी बातमी मिळाली.
बातमी मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण आणि लोणी काळभोर पोलीस पथक यांनी कवडीपाट टोलनाका येथे सापळा लावला. सकाळी साडेआठच्या सुमारास सोलापूरकडून पुणे बाजुकडे सदरचा टेम्पो आला असता त्यास ताब्यात घेवून त्याची पाहणी केली. असता सदर टेम्पोमध्ये एकूण २९ लाख ६६ हजार रुपयांचा गुटखा सापडला. टेम्पो ड्रायव्हर शमीम अब्दुलवाहीद अहमद (वय ३२, रा. कोकटपल्ली हबीबनगर, हैदराबाद) यास सदर टेम्पो व मालासह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन पुणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
कारवाईमध्ये २९ लाख ६६ हजार रुपयांचा अवैध गुटखा व १२ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ४१ लाख ६६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड अप्पर पोलीस अधीक्षक, संदीप जाधव, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महेश ढवाण, पोलीस नाईक समीर चमन शेख, सचिन मोरे, पोलीस कॉन्स्टेबल परशराम सांगळे, सागर कडू यांनी केली.