कपड्यात लपवून नशेसाठी ३० लाखांच्या कफ सिरपची तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 05:49 PM2019-04-01T17:49:35+5:302019-04-01T17:51:16+5:30
या प्रकरणी वीरेंद्र सिंग, यशपाल गोपाल सिंग, सर्वर मोहम्मद शेख, अझहर जमाल सय्यद या चौघांना अटक करण्यात आली.
मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नशेसाठी आणलेला कफ सिरपचा ३० लाखांचा साठा हस्तगत केला आहे. मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान या ठिकाणी पोलिसांनी कफ सिरपच्या बाटल्या भरलेला टेम्पो ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली असून हे सर्व कपड्यात लपवून कफ सिरपच्या बाटल्यांची तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वीरेंद्र सिंग, यशपाल गोपाल सिंग, सर्वर मोहम्मद शेख, अझहर जमाल सय्यद या चौघांना अटक करण्यात आली.
गुजरातहून मोठ्या प्रमाणावर 'कोडेन फॉस्फेट' या सिरपचा साठा मुंबईत येणार असून तो नशेसाठी वितरित केला जाणार असल्याची मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती आणि एक टेम्पो भरून कफ सीरपच्या बाटल्या मुंबईत आणण्यात येताच पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटने मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान येथून एक टेम्पो ताब्यात घेतला. यापैकी दोघे हा टेम्पो गुजरातहून घेऊन आले होते तर अन्य दोघे या कफ सिरपची नशेसाठी खरेदी करण्यासाठी आले होते. टेम्पो तसेच टेम्पोमध्ये लपवण्यात आलेल्या 5760 कफ सिरपच्या बाटल्यांचा साठा पोलिसांनी हस्तगत केला. अटक केलेल्या आरोपींना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.