सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी घेतली ३० हजाराची लाच; एसीबीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 04:30 PM2022-04-11T16:30:48+5:302022-04-11T16:31:21+5:30
ही कारवाई कामगार कार्यालय परिसरातच झाली.
जळगाव : जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कंत्राटी सिक्युरिटी गार्डची नोकरी लावून ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचा शिपाई गोपाळ कडू चौधरी (वय ५५, रा.जुना खेडी रोड, जळगाव) याला ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल. ही कारवाई सोमवारी दुपारी कामगार कार्यालय परिसरातच झाली.
तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असून त्यांनी जळगाव जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कंत्राटी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळावी म्हणून अर्ज सादर केला होता. या नोकरीची ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात गोपाळ चौधरी याने तक्रारदाराकडे २ लाख १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ३० हजार रुपये देण्याचे सोमवारी ठरले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार उपअधीक्षक शशिकांत पाटील, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनील शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदिप पोळ यांच्या पथकाने दुपारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय परीससरात सापळा लावला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौधरीला अटक करण्यात आली आहे.