३० हजारात झाला १० वर्षाच्या मुलीचा सौदा; बालविवाहामागे नरबळीचे षडयंत्र ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 04:50 PM2019-11-11T16:50:39+5:302019-11-11T16:57:19+5:30
अल्पवयीन मुलीची अशा पध्दतीने करण्यात येत असलेली विक्री मानवी तस्करीसाठी की नरबळीसाठी ?
माजलगाव : येथील फुले नगर भागातील एका १० वर्षांच्या मुलीची लग्नाच्या नावाखाली ३० हजारात विक्री करण्याचा डाव परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे रविवारी ( दि.१० ) उधळला गेला. मात्र, यात काही संशयास्पद घटनाक्रम उघडकीस आल्याने अल्पवयीन मुलीची अशा पध्दतीने करण्यात येत असलेली विक्री मानवी तस्करीसाठी की नरबळीसाठी याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी ३ महिलांसह एकूण ६ जणांच्या विरोधात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, मंगलबाई रामेश्वर शिंदे, दिपाली नागोराव डाके, आशामती दिलीप घोलप आणि मंगलबाई हिची मुलगी अयोध्या अंगद जाधव या शहरातील फुले नगर या भागात राहतात. ५ नोव्हेंबरला केज तालुक्यातील कोरडयाची वाडी उर्फ राखाचीवाडी येथे दिपाली हिला नवरा सांभाळत नाही तर अयोध्या हिला मुलबाळ होत नाही यावर उपाय करण्यासाठी एका मांत्रिकाकडे गेल्या. त्यानंतर तिघीही मंगलाबाई यांच्या परिचयाच्या उर्मिला दिनकर यादव हिच्या घरी गेल्या. यावेळी उर्मिला हिने माझ्या मुलासाठी मुलगी बघा असे सांगितले. यावर आशामती यांनी माझ्याकडे मुलगी आहे मात्र लग्न करण्याची ऐपत नाही, लग्नासाठी 20 हजार रुपये तर लग्न करून देते असे म्हटले. यावर उर्मिलाने २० हजार काय ३० हजार रुपये देते व लग्न खर्चसुद्धा आम्हीच करू असे सांगितले.
या बोलणीनंतर तिघीही माजलगाव येथे परतल्या. दरम्यान, आशामतीची मुलगी खेळत असताना, माझे लग्न करणार आहेत पण मला लग्न करायचे नाही असे म्हणत असे. यामुळे परिसरातील नागरिकांना कांहीतरी गडबड असल्याचे व मंगलबाई , आशामती, अयोध्या यांच्यात कांहीतरी शिजत असल्याचे लक्षात आले. यातच शनिवारपासून सदर अल्पवयीन मुलगी बाहेर खेळायला किंवा इतर कामासाठी आली नाही. तर रविवारी सकाळपासून आशामती मुलीसह दिवसभर मंगलबाई हिच्या घरी होती. दरम्यान, राखाचीवाडी येथून उर्मिला दिनकर यादव (६०), संतोष बारीकराव यादव ( २० ) , अजमोद्दीन गणी शेख (४० ) व एकदरा येथून जाफर इस्माईल सय्यद हे मंगलबाईच्या घरी गेले. तर फुलेनगरमध्ये असलेल्या नाल्याच्या पलीकडील बाजूस एक जीप थांबली. अनोळखी लोकांच्या संशयास्पद हालचाली पाहून नागरिकांनी मंगलबाईच्या घराला व जीपला घेराव घातला व पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत ३ महिला व ३ पुरुषांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मंगळसूत्र, बाशिंग, बांगडया,साडी, ड्रेस, नारळ, चप्पल इत्यादी साहित्य आढळून आले. बालविवाह रोखला असला तरी या प्रकरणात नागरिकांनी काळीजादू सारख्या अनैतिक बाबी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे पोलिल या दृष्टीने सुद्धा तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कलम 366अ, 120 ब, 34 आयपीसी तसेच बालविवाह कायदा 8,9 व 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता गायकवाड या करीत आहेत.