फसवणूक प्रकरणी अटकेतील माजी आमदार कुशवाहची रत्नागिरीला ३०० एकर जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 07:21 PM2018-08-08T19:21:46+5:302018-08-08T19:22:18+5:30
विविध राज्यांतील दोन ते तीन हजार गुंतवणूकदारांना सुमारे १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या माजी आमदार बनवारीलाल कुशवाहची रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडगे येथे सुमारे ३०० एकर जमीन असल्याचे तपासातून पुढे आले आहे.
औरंगाबाद : गरिमा रियल इस्टेट अॅण्ड अलाईड लिमिटेड या नावाने कंपनी स्थापन करून विविध राज्यांतील दोन ते तीन हजार गुंतवणूकदारांना सुमारे १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या माजी आमदार बनवारीलाल कुशवाहची रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडगे येथे सुमारे ३०० एकर जमीन असल्याचे तपासातून पुढे आले आहे.
कुशवाहला काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने धौलापूर कारागृहातून ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडीत असताना कुशवाहने जमीन खरेदीची माहिती दिली होती. ही माहिती खरी निघाली असून, जमीन खरेदीचे अनेक खरेदीखत आर्थिक गुन्हे शाखेने मिळविले आहेत. या मालमत्तेच्या विक्रीस मनाई करण्याबाबतचे पत्र रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
धौलपूर (राजस्थान) येथील कुशवाह याने मोठे व्याज देण्याचे आमिष दाखवून औरंगाबादेतील ३५० जणांची फसवणूक केली आहे. गुंतवणूकदार अशोक बापूराव कुºहे यांच्या तक्रारीवरून गरिमा रियल इस्टेट कंपनीचे चेअरमन माजी आमदार बनवारीलाल कुशवाह, संचालक शिवराम कुशवाह, बालाकिशन कुशवाह यांच्यासह आठ संचालकांविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेने खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बनवारीलाल कुशवाहला धौलपूरच्या कारागृहातून ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या पैशातून रत्नागिरी जिल्ह्यात ३०० एकर जमीन खरेदी केल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने या शेतजमिनीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी रत्नगिरी जिल्ह्यातील लांंजा तालुक्यातील कोंडगे गावात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याची खरेदीखते हाती लागली आहेत. मखनलाल कुशवाह, शिवराम कुशवाह, गौरीलाल कुशवाह यांच्या नावावर या जमिनीची खरेदी केल्याचे दिसून येत आहे. जमिनीची खरेदी जरी संचालक मंडळातील सदस्यांच्या वैयक्तिक नावावर केली असली तरी या जमिनीचा मोबदला मात्र कंपनीच्या खात्यातून झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.
विक्री करून गुंतवणूकदारांची देणी चुकती करावी
ठग कुशवाहने रत्नागिरी येथे जमीन खरेदी केल्याची माहिती मिळताच ही मालमत्ता कोणालाही विक्री होऊ नये म्हणून रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे, तसेच अनेकांची फसवणूक करून ही जमीन खरेदी केल्याने ही जमीन शासनाने जप्त करीत न्यायालयामार्फ त विक्री करून गुुंतवणूकदारांची देणी चुकती करावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली जाणार आहे. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असली तरी त्यातून गुंतवणूकदारांना दिलासा मिळू शकतो, असे पोलीस निरीक्षक नवले यांनी सांगितले.
३५० जणांची यादी ग्वाल्हेर कोर्टाला पाठविली
कुशवाहने देशातील जवळपास ३ हजार लोकांना फसविल्याने ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या आदेशाने सेबीने त्याची सर्व मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेची लवकरच विक्री होऊन गुुंतवणूकदारांची देणी परत केली जाणार आहेत. त्यामुळे औरंगाबादेतील ३५० गुंतवणूकदारांची यादी आर्थिक गुन्हे शाखेने ग्वाल्हेर उच्च न्यायालयाला पाठविली आहे.
कुशवाह पुन्हा धौलपूरच्या कारागृहात रवाना
ठग बनवारीलाल कुशवाहची सात दिवसांची पोलीस कोठडी मंगळवारी संपली. त्यामुळे त्याला पुन्हा धौलपूरच्या कारागृहात पाठविण्यात येत आहे.