मेहनतीची कमाई भामट्यांच्या खिशात; दामदुपटीच्या आमिषांचा नागरिकांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 01:26 PM2024-03-18T13:26:56+5:302024-03-18T13:27:19+5:30
लुटली जाणारी रक्कम लाख ते कोटींच्या घरात
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: फसव्या आमिषांना बळी पडून नागरिक कोट्यवधी रुपये गमावत आहेत. त्यामध्ये दामदुपटच्या परताव्याची हमी देणाऱ्या कार्यालयांसह सोशल मीडियावरील आमिषांचा समावेश आहे. परंतु, गुन्हा घडूनही अनेकांना आपण फसलो आहोत याची जाणीव होत नसल्याने पोलिसांकडे तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे.
मसाला आणि सुक्या मेव्याच्या नफ्यातून गुंतवणूकदारांना अधिक नफा दिला देण्याचे आमिष दाखवून ३०० जणांच्या फसवणुकीची घटना नुकतीच समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एसपीव्हीएस कंपनीच्या प्रमुखांवर देखील अशा प्रकरणातून गुन्हा दाखल झाला आहे, तर गतवर्षी उरण परिसरात दामदुप्पटच्या माध्यमातून कोट्यवधींचा अपहार करणारे सतीश गावंड व सुप्रिया पाटील काही महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतरही अनेकांकडून अशा फसव्या स्कीम चालवून नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे झटपट श्रीमंतीच्या प्रयत्नात असलेले सर्वसामान्यांपासून ते गर्भश्रीमंत त्यांच्या गळाला लागत आहेत. शुक्रवारी एपीएमसीत गुन्हा दाखल झालेल्या रुद्रा ट्रेडर्सचा प्रमुख नितीन प्रकाश पार्टे हा देखील एसपीव्हीएस कंपनीशी संबंधित आहे.
‘ती’ कार्यालये एकमेकांशी जोडली
कंपनीतून बाहेर निघाल्यानंतर त्याने स्वतःची कंपनी काढून गुंतवणूक घेण्यास सुरुवात केली होती. तर एपीएमसी आवारात इतरही अशा कंपन्या चालत असून त्यांचाही अपहार काही दिवसात उघड होण्याची शक्यता आहे. तर अशी कार्यालये एकमेकांशी जोडल्याचेही दिसून येत आहे.
लुटली जाणारी रक्कम लाख ते कोटींच्या घरात
दामदुप्पट सोबतच ट्रेडिंगच्या बहाण्याने किंवा इतर कारणांनी ऑनलाईन गुंतवणूक करून घेणाऱ्यांचे जाळे देखील सोशल मीडियावर पसरलेले आहे. त्यामध्ये फसल्या जाणाऱ्यांचे प्रमाण कमी असले तरीही त्यांची लुटली जाणारी रक्कम लाख ते कोटींच्या घरात असते.
नुकतेच एका व्यक्तीला ट्रेडिंगच्या बहाण्याने सव्वा कोटीचा गंडा घातल्याचीही घटना समोर आली आहे. ऑनलाईन फसवणूक झालेल्या व्यक्ती पोलिसांकडे तक्रारीसाठी धाव घेतात, मात्र दामदुप्पटच्या आमिषाला बळी पडून गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती फसवणूक होऊनही पोलिस ठाण्याची पायरी चढत नाहीत.
अशा प्रकरणांना आळा कसा घालायचा, याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.