बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 05:42 AM2024-06-01T05:42:46+5:302024-06-01T05:43:57+5:30
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालात माहिती उघड
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत मार्च २०२४ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या प्रमाणात तब्बल ३०० टक्के वाढ नोंदली गेली आहे. याचा फटका देशातील ३६ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांना बसला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. या फसवणुकीच्या माध्यमातून ग्राहकांना ३० हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याची देखील माहिती समोर आली आहे.
या अहवालानुसार...
- या घोटाळ्याचा सर्वाधिक फटका हा खासगी बँकांच्या ग्राहकांना बसला आहे, तर सरकारी बँकांमधील सायबर घोटाळ्याचे प्रमाण कमी असले तरी सरकारी बँकांच्या ग्राहकांचे पैसे सर्वाधिक गेले आहेत.
- डिजिटल पेमेंट व्यवस्थेच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक झाली आहे.
- फसवणुकीच्या प्रकारात सर्वाधिक ग्राहक हे ऑनलाईन कर्ज प्रकारात फसवले गेले आहेत.
- डेबिट अथवा क्रेडिट कार्ड आणि इंटरनेटवरून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून ती रक्कम तब्बल २९ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
- फसवणूक झाल्यानंतर एका तासाच्या आत तपास यंत्रणांना माहिती दिली तर पैसे परत मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते. मात्र, बहुतांश प्रकरणात लोकांनी उशिरा तक्रार केल्यामुळे देखील त्यांना पैसे परत मिळाले नसल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे.