चोरी गेलेल्या ३०० क्विंटल तुरीचा लावला छडा, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:30 PM2024-07-16T23:30:21+5:302024-07-16T23:30:33+5:30
ट्रक मालकाने कंपनीचे ताब्यात कागदोपत्री ट्रक सुपूर्द केला. त्याच रात्री ९ वाजताचे सुमारास अज्ञात व्यक्तीने हा ट्रक तुरीसह लंपास केला. ७ जुलै रोजी सदर ट्रक बोरगावं जवळ आढळून आला.
- आशिष गावंडे
अकोला: एमआयडीसीतून चोरी गेलेल्या ३०० क्विंटल तुरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. याप्रकरणी मंगळवारी चार आरोपींना अटक करुन ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अब्दुल फारुख अब्दुल खालीद (५५), त्याचा मुलगा गुलाम ख्वाजा मोहम्मद फारूख (२५) दोन्ही रा.पोळा चौक कल्याण वाडी, जुनेशहर अकोला, आरिफ अब्दुल कय्युम (५५)रा. मासुम शाह दर्गा, शिवाजी वसंतराव थोरात (३५)धंदा अडत रा. चिखलगाव ता. जि. अकोला ह.मु. नरेंद्र नगर, डाबकी रोड अकोला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
५ जुलै रोजी मुंबई येथून तुर घेवुन निघालेला ट्रक क्रमांक एमएच-१८-बीजी- ५४९१ हा एमआयडीसी येथील मिडास कंपनीच्या गोडावून मध्ये ६ जुलै रोजी दुपारी दाखल झाला. ट्रक मालकाने कंपनीचे ताब्यात कागदोपत्री ट्रक सुपूर्द केला. त्याच रात्री ९ वाजताचे सुमारास अज्ञात व्यक्तीने हा ट्रक तुरीसह लंपास केला. ७ जुलै रोजी सदर ट्रक बोरगावं जवळ आढळून आला.
हा रिकामा ट्रक एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला. परंतु गुन्हा दाखल नसल्याने हा ट्रक मालकास परत देण्यात आला. या प्रकरणी ६०० बॅग तुर चोरी झाल्याची तक्रार मिडास कंपनीचे मालक बन्सीधर साधवानी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्याकडे केली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार १२ जुलै रोजी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे स्वरुप पाहता पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांना तपास करण्याचे निर्देश दिले होते.
‘एलसीबी’ने तीन दिवसात केली अटक
एमआयडीसी पोलिसांत १२ जुलै रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘एलसीबी’च्या चमुने अवघ्या तीन दिवसांत १५ जुलै रोजी या चोरीचा छडा लावला. चोरी गेलेल्या तुरीसह ट्रक क्रमांक एमएच-१८-बीजी- ५४९१ व चार आरोपींना अटक करुन दाखवली. ही कारवाइ ‘एलसीबी’ प्रमुख शंकर शेळके, ‘पीएसआय’ गोपाल जाधव, आशिष शिंदे, राजपालसिंह ठाकुर, दशरथ बोरकर, गणेश पांडे, फिरोज खान, उमेश पराये, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, खुशाल नेमाडे, अविनाश पाचपोर, आकाश मानकर, मोहम्मद आमीर, अन्सार अहमद यांसह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.