नोकरीच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक; दोन भामट्यांना अटक : ८० उमेदवारांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 09:46 AM2022-03-10T09:46:45+5:302022-03-10T09:46:53+5:30
मेट्रोचे बनावटरीत्या नाव वापरून आरोपी संजय पाटील उर्फ पंकज साळवी आणि त्याची साथीदार दर्शना पराडकर हिने एमएमआरडीएच्या मेट्रो रेल्वेमध्ये नोकरी असल्याची जाहिरात दिली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एमएमआरडीएच्या मेट्रो रेल्वेतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी करून वागळे इस्टेट येथील एका २८ वर्षीय तरुणीसह ८० बेरोजगारांना ३१ लाख २६ हजारांना गंडा घालणाऱ्या दर्शना पराडकर (३२) आणि पंकज साळवी (३३) या दोघांना मंगळवारी रात्री अटक केली. त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
मेट्रोचे बनावटरीत्या नाव वापरून आरोपी संजय पाटील उर्फ पंकज साळवी आणि त्याची साथीदार दर्शना पराडकर हिने एमएमआरडीएच्या मेट्रो रेल्वेमध्ये नोकरी असल्याची जाहिरात दिली होती. त्याच जाहिरातीच्या आधारे २७ सप्टेंबर २०२० ते ७ मार्च २०२० या कालावधीमध्ये वागळे इस्टेट येथील एका २८ वर्षीय महिलेला स्टेशन मास्तरच्या जागेची ऑफर दिली होती. तिच्यासह अन्यही ७९ तरुणांना मेट्रोl नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३१ लाख २६ हजार ८०० रुपये घेतले. त्याबदल्यात त्यांना नोकरीही लावली नाही. तसेच घेतलेले पैसेही परत न करता त्यांची फसवणूक केली. त्याबाबत त्यांनी वारंवार विचारणा करूनही वेगवेगळी उत्तरे दिली. यातील तक्रारदार तरुणीचा या भामट्यांवर संशय बळावल्यामुळे तिने पंकज आणि दर्शना या दोघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांचे आवाहन
नोकरीच्या आमिषाने आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी वागळे इस्टेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी केले आहे. यातील आरोपींनी प्रत्येक वेळी आपली नावे वेगवेगळी सांगितल्याचेही समोर आले आहे.