नवी मुंबईत विविध गुन्ह्यांतील ३,१४८ आरोपींचा पोलिसांना चकवा; ६९३ आरोपी फरार घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:58 PM2020-10-11T23:58:48+5:302020-10-11T23:59:02+5:30
शोध घेऊनही लागले नाहीत हाती, काही गुन्हेगारांना राज्याबाहेरून शोधून आणण्यात पोलिसांनी आपली कामगिरी दाखवून दिली आहे. उर्वरित गुन्ह्यांतील आरोपी अद्याप मोकाटच आहेत
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : विविध गुन्ह्यांतील सुमारे ३,१४८ आरोपी मागील वर्षभरापासून पोलिसांना चकवा देत आहेत. या गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांनी जंग पछाडूनही ते हाती लागलेले नाहीत. परिणामी, त्यापैकी ६९३ आरोपींना फरार घोषित करण्यात
आले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वर्षाला साधारण सात हजार गुन्हे घडत आहेत. त्यात हत्या, खंडणी, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यांसह चोरी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्हा घडल्यानंतर अनेकदा तातडीने कसून तपास करून गुन्ह्यांची उकल करण्यावर पोलिसांकडून जोर दिला जातो. मात्र, काही सराईत गुन्हेगार कसलाही पुरावा मागे सोडत नसल्याने ते हाती लागत नाहीत, तर काही गुन्हेगारांची ओळख पटूनही ते पोलिसांच्या हाती तुरी देऊन पोबारा करतात. अशा गुन्हेगारांचा शोध घेऊनही पोलिसांना त्यात यश न आल्याने, त्यांना पाहिजे असलेले आरोपींच्या यादीत समाविष्ट केले जाते. त्यानुसार, २०१९ मध्ये तब्बल ३,१४८ आरोपींनी पोलिसांना चकवा दिला आहे. त्यापैकी ६९३ गुन्हेगारांना फरार घोषित करण्यात आले आहे.
सर्वत्र कसून शोध घेऊन हे आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यात वाशी पोलिस ठाणे हद्दीतील सर्वाधिक ३६४ गुन्हेगार आहेत.
नवी मुंबई पोलिसांनी अद्याप गुन्हे प्रकटीकरणात अपेक्षित यश मिळविलेले नाही. अशातच शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालला आहे. यामुळे पाहिजे असलेले व फरार गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नव्याने घडणारे गुन्हे व जुन्या गुन्ह्यातील आरोपी यांना अटकाव घालण्याची कसरत पोलिसांना करावी लागत आहे. अनेकदा गुन्हेगार समोर असताना पोलिसांकडून त्याला अटकाव घालण्यात चालढकल होते. कोपरखैरणेतील एका अमली पदार्थ विक्रेत्याने गुन्हे शाखेच्या पथकावर हल्ला केला होता. या घटनेनंतर तो अनेकदा कोपरखैरणेत वावरत असतानाही पोलीस त्याला अटक करू शकली नाही, तर घणसोली येथे महिलेचे शीर व धड वेगळे करून झालेल्या हत्येचा आरोपी मोकाटच आहे.
बहुतांश गुन्हेगार शहराबाहेरील; राज्याबाहेरील गुन्हेगारांचाही सामावेश
बहुतांश गुन्हेगार शहराबाहेरील तर काही राज्याबाहेरील आहेत. शहरात घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यात राज्याबाहेरील गुन्हेगारांचाही हात असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. अशा गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांची दमछाक होत आहे.
काही गुन्हेगारांना राज्याबाहेरून शोधून आणण्यात पोलिसांनी आपली कामगिरी दाखवून दिली आहे. उर्वरित गुन्ह्यांतील आरोपी अद्याप मोकाटच आहेत. लॉकडाऊननंतर नवी मुंबई शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढू लागली आहे. त्यात या पाहिजे असलेल्या अथवा फरार आरापींचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मागील वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या आरोपींच्या शोधावर पोलिसांनी भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.