सेल्स टॅक्स अधिकारी बनून अंगडियाच्या ३२ लाखांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 06:02 AM2023-02-27T06:02:30+5:302023-02-27T06:02:41+5:30
मंगलदास मार्केटचा सुरक्षारक्षक सुपरवायझर निघाला लुटारू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : झवेरी बाजार बुलियन मार्केटमधील एका व्यावसायिकाला अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘स्पेशल २६’ चित्रपटाप्रमाणे ईडीचे अधिकारी असल्याचे भासवत सुमारे चार कोटींच्या ऐवजाची लूट करण्यात आल्याची घटना ताजी असताना सेल्स टॅक्स अधिकारी बनून दोघांनी ३२ लाखांची रोकड लुटल्याची घटना शनिवारी घडली. या गुन्ह्याचा
अवघ्या काही तासांत छडा लावत लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संजयसिंग करचोली (३३), रजिया शेख (३६) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
काळबादेवी येथील रहिवासी असलेले तक्रारदार जठाराम प्रजापती (२८) हे अंगडिया बाबूलाल प्रजापती (३८) यांच्याकडे पैसे तसेच कपड्याचे पार्सल घेणे-देण्याचे काम करतात. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी विष्णू कांती अंगडियाकडून त्यांच्या मालकाच्या व्यवहाराचे ३२ लाख रुपये घेऊन येत असताना करचोली आणि शेख यांनी ते सेल्स टॅक्स अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याकडील रोकड आणि आणि मोबाइल हिसकावून पळ काढला. प्रजापती यांनी पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.
त्यानुसार, पोलिस उपायुक्त अभिनव देशमुख, सहायक पोलिस आयुक्त जोत्स्ना रासम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती देसाई यांच्या नेतृत्वात तपास अधिकारी राहुल भंडारे, इलग, बनकर, रूपेश पाटील, लाड, भाले आणि अंमलदार यांनी तपास सुरू केला.
यापूर्वी ‘स्पेशल २६’ रिटर्न
झवेरी बाजार बुलियन मार्केटमधील एका व्यावसायिकाला अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘स्पेशल २६’ चित्रपटाप्रमाणेच ईडीचे अधिकारी बनून लुटणाऱ्या टोळीला लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींनी धमकावून ३ किलो सोने आणि २५ लाख रुपये लुटल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात त्या बॅगांमध्ये सव्वा दोन कोटी रुपये होते, अशी माहिती व्यावसायिक विराटभाई यांनी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या आरोपींजवळून लुटीतील १ कोटी ९० लाख रुपये हस्तगत केले आहेत.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींनी वापरलेल्या दुचाकीचा माग काढून करचोलीला मंगलदास मार्केट परिसरातून ताब्यात घेतले. तो मंगलदास मार्केटमध्ये सुरक्षारक्षक सुपरवायझर म्हणून काम करतो. शेखच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली देताच शेखलाही अटक केली. दोघांना १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.