३२ लाखांचे झाले ३२ रुपये! वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या खात्यातील सुरक्षित मुद्देमाल गायब
By मनीषा म्हात्रे | Published: June 22, 2023 12:27 PM2023-06-22T12:27:39+5:302023-06-22T12:28:05+5:30
गेल्या वर्षी या खात्यात ३२ लाख रुपये व्याजासहित जमा असल्याचे दिसून आले.
मुंबई : एखाद्या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल सुरक्षित रहावा यासाठी पोलिस खात्यात एक सिस्टीम असते. जप्त मुद्देमाल रोख रकमेत असेल तर ती रक्कम संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाच्या खात्यावर ठेवली जाते. मात्र, त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाले तर रकमेला कसे पाय फुटतात याचे मासलेवाईक उदाहरण मुलुंडमध्ये समोर आले आहे. तब्बल ३२ लाख रुपयांवर बँक कर्मचाऱ्यानेच डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले असून, खात्यावर केवळ ३२ रुपयेच शिल्लक राहिले आहेत. याप्रकरणी नवघर पोलिसांनी बँक ऑफ बडोदाच्या रिलेशनशिप मॅनेजरला अटक केली असून, त्याचे नाव विनोद सिंग असे आहे.
जयानंद राणे हे पोलिस शिपाई नवघर पोलिस ठाण्यात सेफ मुद्देमाल कारकून म्हणून कार्यरत आहेत. २००३ मध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीकडून १६ लाख ८० हजार २७२ रुपये जप्त करण्यात आले होते. त्यावेळी नवघर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण खरपडे यांच्या नावे काढलेल्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली होती. त्यांच्यानंतर आलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी ही रक्कम स्वत:च्या खात्यावर घेतली नाही. गेल्या वर्षी या खात्यात ३२ लाख रुपये व्याजासहित जमा असल्याचे दिसून आले.
खरपडेंच्या नावाने काढले पैसे...
१२ मे रोजी खरपडे नाव सांगणाऱ्या खातेधारकाने धनादेशद्वारे ५ लाख १० हजारांची रोकड बँकेतून घेतली.
बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये पैसे काढणारी व्यक्ती दुसरीच असल्याचे दिसून आले. धनादेशावर केलेली सहीही बनावट होती.
खरपडे यांच्याकडे विचारणा केली असता याबाबत काही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
खाते नावाने नको...
एखाद्या गुन्ह्यातील तपास सुरू असताना त्यातील रक्कम सुरक्षित रहावी म्हणून वरिष्ठ निरीक्षकांच्या नावाने खाते उघडून त्यात ती रक्कम ठेवली जाते. मात्र, ती रक्कम वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या नावाऐवजी त्या पदाने ठेवणे गरजेचे असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच यापुढे या खात्याची जबाबदारी तिघांकडे देणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताराम गिरप यांनी सांगितले.
अन् घोटाळा आला लक्षात...
दत्ताराम गिरप यांनी दि. १० जून रोजी नवघर पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी मुद्देमालाबाबत चौकशी करत खात्यातील रक्कम वपोनि, नवघर पोलिस ठाण्याच्या खात्यात जमा करण्याबाबत विचारणा करण्यास सांगितले. त्यानुसार जयानंद राणे यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता खात्यात केवळ ३२ रुपये शिल्लक असल्याचे आढळले. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली.
असा झाला घोटाळा...
खरपडे यांच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करत २८ मार्च रोजी हे खाते सक्रिय करण्यात आले.
त्यानंतर ५ ते १५ मे दरम्यान खात्यातील रक्कम युवी फायनान्स यांच्याकडे हस्तांतरित केल्याचे दिसून आले.
गिरप यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. पुढे आरटीजीएसद्वारे काही रक्कम ट्रान्स्फर केल्याचे दिसून आले. त्यानुसार, गुन्हा नोंदविण्यात आला.
खात्यातील पैसे गोठविताच विनोद सिंगला तसा संदेश गेला. त्यानंतर त्याने बँकेत येणे बंद केले. अखेर तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याला अटक करण्यात आली.
विनोदने त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या युवी फायनान्स नावाने आलेल्या बँक खात्यात २८ लाख रुपये ट्रान्सफर केले होते. विनोदच्या पत्नीचा यात सहभाग आहे किंवा कसे याचा तपास सुरू आहे.