रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावावर ३४ लाखांनी फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:49 PM2020-07-16T23:49:44+5:302020-07-16T23:51:05+5:30
रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने स्वत:चा मुलगा व मुलीच्या माध्यमातून १२ जणांना ३४.४५ लाख रुपयांनी फसविले आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने स्वत:चा मुलगा व मुलीच्या माध्यमातून १२ जणांना ३४.४५ लाख रुपयांनी फसविले आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीमध्ये अर्चना राकेश मेहता, तिचा मुलगा निर्भय मेहता, मुलगी हिना मेहता व सहकारी फारुख शेख यांचा समावेश आहे.
आरोपी मूळचे मुंबईतील रहिवासी आहेत. अर्चना स्वत:ला रेल्वेतून भंगार खरेदी करणारी व्यावसायिक सांगत होती. ती २०१४ मध्ये मनीषनगर येथे किरायाने राहत होती. दरम्यान, ती कळमना येथील फुलेश्वर दुबेले यांच्या संपर्कात आली. तिने दुबेले यांना रेल्वेत ओळखी असल्याचे सांगितले. रेल्वेत चतुर्थ श्रेणीच्या पदावर नोकरी लावून देण्याचे सांगितले. दुबेले यांनी त्यांच्या परिचित लोकांना अर्चनाशी ओळख करून दिली. तिने सर्वांना नोकरी लावून देण्याचा विश्वास दिला. त्यासाठी दुबेलेच्या माध्यमातून तिने १२ लोकांकडून ३४.४५ लाख रुपये घेतले. त्यांचे मुंबईच्या सेंट्रल रेल्वे हॉस्पिटलचे बोगस प्रमाणपत्र बनविले. बनावट नियुक्तीपत्रही त्यांना दिले. नोकरी न लागल्यामुळे दुबेले व त्यांच्या परिचितांची चिंता वाढली. त्यांनी चौकशी केल्यावर नियुक्तीपत्र बोगस असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते अर्चनाकडून पैसे परत मागू लागले. फसवणुकीचे घबाड उघडकीस आल्यामुळे अर्चना डिसेंबर २०१९ मध्ये कुटुंबासह फरार झाली. त्यानंतर पीडितांनी तिला संपर्क केला, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्यांनी बेलतरोडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
शिक्षिकेने केली फसवणूक
शाळेत चपराशी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ८.५० लाख रुपयांनी फसवणूक करणाऱ्या एका शिक्षिकेविरोधात गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षिकेचे नाव चंद्रभागा मनोहर सोनवणे असून ती भोलेनगर, पिपळा रोड येथील रहिवासी आहे. ही शिक्षिका नंदनवन स्थित जवाहर शाळेत कार्यरत आहे. पीडित आशिष मौदेकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार शिक्षिकेने शाळेत चपराशी पदावर नोकरीवर लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ८.५० लाख रुपये घेतले होते.