महेश मांजरेकर यांच्याकडे मागितली ३५ कोटींची खंडणी? लॉकडाऊनमुळे बेरोजगार चहाविक्रेत्याकडून धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 02:06 AM2020-08-30T02:06:02+5:302020-08-30T02:07:33+5:30
चहाविक्रेत्याने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे तब्बल ३५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याने तुळसकर याला ओळखणारे त्याचे शेजारीपाजारी, त्याचे ग्राहक चक्रावून गेले आहेत.
- कुमार बडदे
मुंब्रा : एक दिव्यांग मुलगा आणि पत्नीसह दिवा येथे वास्तव्याला असलेल्या मिलिंद तुळसकर या चहाविक्रेत्याने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे तब्बल ३५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याने तुळसकर याला ओळखणारे त्याचे शेजारीपाजारी, त्याचे ग्राहक चक्रावून गेले आहेत. अगोदरच गरिबी आणि बेरोजगारीचा सामना करीत असलेल्या तुळसकर याने लॉकडाऊनच्या काळात आलेल्या आर्थिक विपन्नतेतून व नैराश्यातून हे कृत्य केले असावे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
तुळसकर राहत असलेल्या दिव्यातील इमारतीला भेट दिली असता व त्याच्या शेजारीपाजाऱ्यांशी बोलले असता तो असे काही करेल, याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. तुळसकर याचा कुठल्या गँगशी संबंध असेल, असे त्याचे वर्तन व त्याच्याकडे येणाºयाजाणाऱ्यांकडे पाहता कधीच वाटले नाही, असे शेजारी म्हणाले.
तुळसकर पूर्वी डोंबिवली येथे राहत होता. तेथील घराचे भाडे परवडत नसल्यामुळे दीड वर्षापूर्वी दिव्यातील विष्णुदादा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक १०४ मध्ये राहण्यास आला होता.
अंधेरी येथे राहत असलेल्या शोभा हागे या खोलीच्या मूळ मालकिणीबरोबर अलीकडेच त्याने करारनाम्याचे नूतनीकरण केले होते. तुळसकर अत्यंत शांत स्वभावाचा असून, मागील वर्षभरात झालेल्या सोसायटीच्या पाचपैकी तीन बैठकांना हजर होता. सोसायटीच्या बैठकीत तो फक्त इतरांचे म्हणणे ऐकून घ्यायचा. फारसा बोलत नव्हता, असे इमारतीमधील रहिवाशांनी सांगितले.
त्याचबरोबर त्याचे नातेवाईक आठवड्यातून एकदोन वेळा त्याला तसेच त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी येत होते. तो घरमालकाचे भाडे तसेच इमारतीच्या देखभालीचा खर्च वेळच्यावेळी देत होता. तो जर गुन्हेगारी प्रवृतीचा असता, तर या इमारतीमध्ये राहत असलेल्या रेल्वे तसेच शहर पोलिसांच्या ही बाब वेळीच लक्षात आली असती, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एकूणच त्याच्या या वागणुकीवरून तसेच आर्थिक परिस्थितीवरून तो अबू सालेमच्या नावाने खंडणी गोळा करीत असेल, असा विश्वास वाटत नाही, असे इमारतीमधील काही रहिवाशांचे म्हणणे आहे.
‘...तर घर रिकामे करण्यास सांगणार’
तुळसकर याच्या कृत्यामुळे त्याचा दिव्यांग मुलगा व पत्नी यांना भविष्यात विनाकारण अवहेलनेला सामोरे जावे लागेल, असे अनेकांचे म्हणणे आहे. तुळसकरवरील गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला इमारतीमधील खोली रिकामी करण्यास सांगण्यात येईल, अशी माहिती इमारतीचे सरचिटणीस राजेश पांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.