निवृत्त सैनिकांना साडेतीन कोटींचा गंडा; नोकरीच्या अमिषाला २९ सैनिक फसले
By वैभव गायकर | Published: August 18, 2023 05:49 PM2023-08-18T17:49:12+5:302023-08-18T17:49:30+5:30
खारघर पोलीस ठाण्यात याबाबत ३१ जणांनी लेखी तक्रार दाखल केली असुन यामध्ये जवळपास २९ सैनिक आहेत.
पनवेल : कामाच्या आमिषाने आर्थिक फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत असतात. दररोज याबाबत बातम्या वाचायला मिळतात. मात्र देशाच्या सीमेचे रक्षण केलेल्या निवृत्त सैनिकांना देखील गंडवण्याचे प्रकार सुरु आहेत. खारघर पोलीस ठाण्यात याबाबत ३१ जणांनी लेखी तक्रार दाखल केली असुन यामध्ये जवळपास २९ सैनिक आहेत.
मागील दोन वर्षांपासून टप्प्याटप्प्याने ३१ जणांकडून ठराविक पैसे आकारल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही रक्कम दोन लाखांपासून अठरा लाखा पर्यंतच्या घरात आहे.निवृत्त सैनिक असलेले बाळकृष्ण भोसले नामक व्यक्तीने हि फसवणूक केल्याचा आरोप ३१ जणांनी केला आहे. संबंधित व्यक्ती खारघर शहरात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनसेचे शहर अध्यक्ष गणेश बनकर यांच्याकडे याबाबत फसवणूक झाल्याचा प्रकार आला तेव्हा त्यांनी याबाबत खारघर पोलीस ठाण्यात धाव घेत या निवृत्त सैनिकांना तक्रार दाखल करण्यास सांगितली.आरबीआय मध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने हि फसवणूक करण्यात आली आहे.फसवणूक झालेल्यामध्ये पनवेल, मुंबई, पुणे आणि कोंकणातील निवृत्त सैनिकांचा समावेश आहे.
नोकरी लागण्यासाठी अनेकांनी कर्ज काढले आहे.मात्र नोकरी तर सोडाच आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे फसवणूक झालेले निवृत्त सैनिक संजय पवार यांनी सांगितले.फसवणूक केलेला इसम सर्रास खुलेआम बाहेर फिरत आहे.पैशाबाबत विचारणा केली असता मी तुम्हाला पैसे परत करेन असे खोटे आश्वासन आम्हाला देत असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.बाळकृष्ण भोसले नामक व्यक्तींशी याबाबत संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद असल्याचे पहावयास मिळाले.
प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवणार
निवृत्त सैनिकांच्या आर्थिक फसवणुकीची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे.25 लाखांपेक्षा जास्त आर्थिक फसवणुकीचे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जातो.त्यानुसार आम्ही हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवल्यांनंतर निश्चितच यासंदर्भात तथ्य पाहुन गुन्हा दाखल होईल.
- राजीव शेजवळ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,खारघर )