इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा सांगून इंजिनियर महिलेला ३६ लाखांचा चुना
By भाग्यश्री गिलडा | Published: November 4, 2023 08:56 PM2023-11-04T20:56:12+5:302023-11-04T20:56:56+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेला अनोळखी क्रमांकावरून व्हाॅट्सॲपवर मेसेज आला.
पुणे : फक्त इंस्टाग्राम आयडीला फॉलो करून चांगले पैसे कमावता येतील असे सांगून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विश्रांतवाडी परिसरात राहणाऱ्या महिलेने सायबर पोलिसांना तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे फिर्यादी महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेला अनोळखी क्रमांकावरून व्हाॅट्सॲपवर मेसेज आला. पार्टटाइम नोकरीसाठी सहमत असल्याचे सांगितल्यावर त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. त्यानंतर इंस्टाग्राम आयडीला लाईक करण्याचे टास्क दिले. सुरुवातीला टास्क पूर्ण केल्याचा काही प्रमाणात मोबदला देऊन फिर्यादींना विश्वासात घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून पैसे भरण्यासाठी तगादा लावला.
एकूण ३६ लाख ४७ हजार रुपये भरण्यासाठी महिलेला भाग पाडण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत करत आहेत.