भाईंदरमध्ये चोर समजून तरुणाची मारहाण करून हत्या, ४ आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 07:31 PM2021-03-06T19:31:04+5:302021-03-06T19:32:47+5:30
Crime News : नवघरच्या शंकर नारायण महाविद्यालयाच्या समोरील महापालिका मैदानात एका तरुण पडलेला असल्याची माहिती पहाटेच्या सुमारास पोलिसांना मिळाली.
मीरारोड - चोर समजून एका तरुणास बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना भाईंदर पूर्वेच्या इंदिरा नगर भागात शनिवारी पहाटे घडली आहे. नवघर पोलिसांनी या प्रकरणी चार तरुणांना अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा प्रकारे कोणाला मारहाण करू नका, पोलिसांना कळवा असे आवाहन केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवघरच्या शंकर नारायण महाविद्यालयाच्या समोरील महापालिका मैदानात एका तरुण पडलेला असल्याची माहिती पहाटेच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील तरुणाची ओळख पटवली असता त्याचे नाव सुरजभान सोनी ( २४ ) रा. गोरेगाव मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद पाटील व पथकाने त्वरित तपास करत काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यातील चार तरुणांनी चोर समजून सोनीची लाकडी पट्ट्या व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याचे आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. आरोपी हे इंदिरा नगरमध्येच राहणारे असून सर्व १९ ते २२ वयोगटातील आहेत.
पहाटे ३ ते ३.३० च्या सुमारास सदर आरोपीना सोनी हा स्मशानभूमीच्या मागील भागात बसलेला दिसला. त्याला चोर समजून आरोपींनी बळजबरी पकडून मैदानात आणले व तेथे त्याची बेदम मारहाण करत हत्या केली. आरोपीना त्याच भागात राहणारा एक मोबाईल चोर सुद्धा तेथे असल्याचा दिसल्याने सोनी सुद्धा चोर आहे समजून हत्येपर्यंत प्रकार गेला. पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ पुढील तपास करत आहेत. सोनी हा पूर्वी भाईंदरला राहत होता. परंतु तो सध्या गोरेगावला नातलगांकडे राहत होता. त्यामुळे येथे कशासाठी आला होता? याचे कारण अजून कळू शकलेले नाही.