समशेरपूर दुहेरी हत्याकांडातील ४ आरोपींना अटक; ५ दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 06:34 PM2021-07-01T18:34:18+5:302021-07-01T18:35:07+5:30
Crime News : धम्मापाल याचा मारेकरी असलेला दिपकराज मरण पावला; परंतु दिपकराज याच्या मारेकऱ्याचा शोध घेत पोलीसांनी १ जुलै रोजी या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली.
- संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यातील समशेरपूर येथे प्रेम प्रकरणातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील ४ आरोपींना ग्रामीण पोलीसांनी १ जुलै रोजी अटक केली. सदर हत्याकांड ३० जून रोजी तालुक्यातील समशेरपूर येथे सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान घडले.
ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील समशेरपूर येथे ३५ वर्षीय युवक धम्मापाल उर्फ आदेश महादेव आटोटे याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. घटने नंतर चिडलेल्या गावकऱ्यांनी त्याचा मारेकरी असलेला दिपकराज सहदेव डोंगरे (५३) राहणार प्रतिक नगर मूर्तिजापुर, याला लाठ्या काठयांनी बेदम मारहाण केली, यात दिपकराज हा गंभीररीत्या जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते, अकोला येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. धम्मापाल याचा मारेकरी असलेला दिपकराज मरण पावला; परंतु दिपकराज याच्या मारेकऱ्याचा शोध घेत पोलीसांनी १ जुलै रोजी या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली. सदर हत्याकांड हे प्रेम प्रकरणातून घडले असल्याचे मृतक धम्मपाल याचा भाऊ विनोद आटोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्या उलट मृतक दिपकराज डोंगरे याच्या मुलीची फिर्याद पोलीसांनी ३० जून रोजी पोलीसांनी नोंदवून घेतली, मृतक धम्मपाल याने तुमच्या मुलीशी मला लग्न करायचे आहे असे म्हटले, त्यावर दिपकराज याने तु माझ्या मुलीला त्रास का देतो, तुझे लग्न झालेले आहे, तिचा नाद सोडून दे, असे म्हटले असता धम्माल याने जमाव करुन माझ्या वडिलांना विनोद आटोटे, महादेव आटोटे, इंदुबाई आटोटे, आणखी ८ ते १० जणांनी लाठ्या काठयांनी बेदम मारहाण केली यात त्यांचा मृत्यू झाला. असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संतोष नागोराव आटोटे (४५), प्रभाकर जानराव आटोटे (३०), विजय लाला आटोटे (३३), जितेंद्र शत्रुघ्न आटोटे (३३) या चार आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांची ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आली आहे.
असे घडले हत्याकांड
दिपकराज डोंगरे हे हत्या करण्याच्या उद्देशाने सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास मूर्तिजापूरहून समशेरपूर येथे पोहोचून धम्माल याच्या घरी गेले, तेव्हा धम्मपाल चा भाऊ बाहेर उभा होता, तर धम्मपाला काही कार्यकर्ते भेटायला येणार होते म्हणून तो घरात बिछायत करीत होता धम्मपालला काही कळायच्या आत दिपकराज याने त्याच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकले तो रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच गतप्राण झाला. काय प्रकार झाला म्हणून विनोद हा बघायला गेला झडापटीत विनोदीही जखमी झाला. दरम्यान दिपकराज हत्या करुन पळ काढत असतानाच गावातील काही लोकांनी त्याला घेरून लाठ्या काठयांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत काही तासातच त्याचा मृत्यू झाला.