मनसेच्या शेलार हल्ल्याप्रकरणी ४ जणांना अटक, सूत्रधार मोकाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 20:48 IST2020-11-10T20:47:38+5:302020-11-10T20:48:41+5:30
Attack Case : उल्हासनगर मनसे विध्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार हे मित्रा सोबत ८ ऑक्टोबर राजी सकाळी नेहमीप्रमाणे अंबरनाथ गोविंद तीर्थ पुलाच्या रस्त्याने मॉर्निग वॉक करीत होते.

मनसेच्या शेलार हल्ल्याप्रकरणी ४ जणांना अटक, सूत्रधार मोकाट
उल्हासनगर : मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर गेल्या महिन्यात मॉर्निंग वॉक वेळी चौघांनी तलवारीने हल्ला केला. शहर गुन्हे अन्वेषण विभागाने ४ जणांना अटक केली असून न्यायालयाने ११ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली. मात्र मुख्य सुत्रदार खुला असल्याची प्रतिक्रिया शेलार यांनी दिली.
उल्हासनगरमनसे विध्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार हे मित्रा सोबत ८ ऑक्टोबर राजी सकाळी नेहमीप्रमाणे अंबरनाथ गोविंद तीर्थ पुलाच्या रस्त्याने मॉर्निग वॉक करीत होते. त्यावेळी दोन मोटार सायकळीवरून आलेल्या चौघांनी मनोज शेलार यांच्यावर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तलवारीने हल्ला केला. मात्र शेलार यांच्या सतर्कतेमुळे तलवारीचा वार हातावर लागून आरडाओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले. याप्रकरणी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान अंबरनाथ मनसे उपशहाराध्यक्ष पाटील यांचा खून झाल्याने, शेलार यांच्या तपासात गती आली. शहर गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास करीत असताना व शेलार यांच्या गुन्हेगारांच्या विश्लेषणावरून ६ नोव्हेंबर रोजी कल्याण दुर्गाडी पूल परिसरातून चौघांना मोटारसायकली वरून जाताना अटक केली आहे.
शहर गुन्हे अन्वेषण विभागाने गुप्त माहितीच्या आधारे साफळा रचून कल्याण, भिवंडी परिसरात राहणाऱ्या साजिद मोहम्मद वकील शेख, अक्षय विनोद गिरी, दीपक तिवारी व रोहित कांबळे यांना कल्याण दुर्गाडी पुलाजवळ अटक केली. त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेली तलवार, मोटारसायकल, दोन मोबाईल जप्त केले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मात्र कोणाच्या सांगण्यावरून हल्ला केला. त्या सुत्रधाराचे नाव उघड न झाल्याने विविध चर्चेला उत आला. न्यायालयाने त्यांना ११ नोव्हेंबर पर्यंत चौघाना पोलीस कस्टडी देण्यात आली असून त्यांच्यावर कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख महेश तरडे यांनी दिली आहे.