पालघरमध्ये ४ कोटी २५ लाखांची रोकड जप्त; बँकेचे पैसे मग महाराष्ट्र बॉर्डरवर कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 04:29 PM2024-10-30T16:29:35+5:302024-10-30T16:30:16+5:30
निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी रोकड, दारू जप्त करण्यात येत आहे.
पालघर - मुंबई अहमदाबाद मार्गावरील उधवा येथील चेक पोस्टवर ४ कोटी २५ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी केली जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रशासित प्रदेशातील सिलवासा येथे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ही रोकड नेण्यात येत होती असं सांगण्यात येते.
बँकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं पोलिसांनी ऐकले परंतु ही रोकड महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवर आली कशी? असा प्रश्न पालघर पोलिसांनी उपस्थित केला आहे. सध्या या रोख रकमेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी रोकड, दारू जप्त करण्यात येत आहे. याआधी पुणे बंगळुरू हायवेवर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ खासगी कार पोलिसांनी अडवली. त्यावेळी या कारमधून पोलिसांनी जवळपास ५ कोटींची रक्कम जप्त केली.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा वळण रस्ता, येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर आणि सहकार नगर, लिंक रोड, चेंबूर, मुंबई या ठिकाणी परराज्यात निर्मित असलेला भांग मिश्रीत पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर २६ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. यामध्ये चेंबूर येथील कारवाईत ५ व मुंब्रा येथील कारवाईमध्ये २ अशा एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईमध्ये एकूण ५४ लाख ४८ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालापैकी चेंबूर येथे ३५ लाख ७३ हजार ४०० व मुंब्रा येथे १८ लाख ७५ हजार २०० रूपयांचा समावेश आहे.