४ सोन्याचे हार अन् चेनवर लिहिलं 'हे' इंग्रजी अक्षर; ईडीला सापडलं ८ किलो सोनं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 05:49 PM2022-08-04T17:49:52+5:302022-08-04T17:50:11+5:30
पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्यात १० वर्षापूर्वीची ओळख असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोलकाता - शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या अर्पिता मुखर्जी हिच्या भोवती ईडीच्या चौकशीचा फास आवळत चालला आहे. मागील २७ जुलैला ईडीने अर्पिताच्या कोलकाता येथील एक मालमत्तेवर धाड टाकली. त्यात २७ कोटींची रोकड पाहून अधिकारीही अवाक् झाले. या छाप्यात ६ हजार ५८० ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले. ईडीने तपासावेळी जवळपास ४.३१ कोटी रुपयांचे सोने अर्पिताच्या घरातून जप्त केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने २७ जुलैला अर्पिताच्या बेलघोरिया येथील संपत्तीवर धाड टाकली. त्यावेळी २ फ्लॅट सील करण्यात आले. मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. मागील छाप्याच्या तुलनेने यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांना सोने सर्वाधिक सापडले. २४ कॅरेटचं ६ हजार ५८० ग्रॅम सोने ईडीने ताब्यात घेतले. त्यात २२ कॅरेटच्या १५७२ सोन्याच्या विटाही सापडल्या. ७२४ सोन्याचे कडे. २२ कॅरेटचे २ ब्रासलेट ईडीने जप्त केले. ईडीची छापेमारी इथपर्यंतच मर्यादित न राहता आता आणखी तपास सुरू केला आहे. त्यात ईडीच्या हाती ४ मोठे सोन्याचे हार सापडले आहेत. १८ इयररिंग्स, सोन्याचा पेन, ५ अंगठ्या जप्त केल्यात.
सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे त्यावर इंग्रजी अक्षरात A लिहिण्यात आले आहे. ५ ऑगस्टपर्यंत अर्पिता मुखर्जी ईडीच्या कोठडीत आहे. पार्थ चॅटर्जीलाही ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. परंतु ते चौकशीस सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे. हे सगळे पैसे माझे आहेत असा स्वीकार केले नाहीत. परंतु अर्पिताने कबुलीजबाब दिला आहे. त्याशिवाय अर्पिता मुखर्जी आणि पार्थ चॅटर्जी एकमेकांना खूप आधीपासूनच ओळखत होते हेदेखील स्पष्ट झाले आहे.
आजतकच्या वृत्तानुसार, पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्यात १० वर्षापूर्वीची ओळख असल्याचं सांगण्यात येत आहे. तेव्हा या दोघांनी एक प्रॉपर्टी खरेदी केली होती त्याचे नाव अ-पा असं ठेवण्यात आले होते. हे फार्म हाऊसच्या नेम प्लेटवरही लिहिण्यात आले होते. टीमसीने पार्थ चॅटर्जी यांच्याकडून हात झटकून दिले आहेत. मंत्रिमंडळातून पार्थ चॅटर्जींना हटवण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी टीमला कामाला लावलं आहे.