'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यमातून २५ लाखांची लॉटरी लागली असल्याचे सांगत महिलेला ४ लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:04 PM2020-06-29T14:04:55+5:302020-06-29T14:07:17+5:30
प्रत्यक्षात या महिलेने कोणतीही कधी लॉटरी काढली नव्हती. मात्र,२५ लाख रुपये मिळणार हे समजल्यावर या महिलेने म्हणतील, त्यानुसार बँकेत पैसे भरायला सुरुवात केली.
पुणे : आपल्याकडे असलेल्या पैशांतून अधिक पैसे मिळविण्याची इच्छा सर्वांनाच असते़ मात्र, कोणतीही लॉटरी न काढताही २५ लाखांची लॉटरी लागल्याच्या आलेल्या फोनने हुरळून जाऊन एका महिलेला तब्बल ४ लाख १५ हजार रुपये गमवावे लागले. ज्योतिष सांगणार्या या महिलेला आपल्या भविष्यात काय आहे, हे मात्र समजू शकले नाही.
याबाबत एका ३१ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी ५ मोबाईलधारक व स्टेट बँक खातेधारकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ एप्रिल ते १२ मे दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फिर्यादी महिला डहाणुकर कॉलनीत रहायला आहेत. त्यांना शर्मा असे नाव सांगणार्या एकाने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना आपण मुंबईतील एसबीआयचा मॉकेटिंग हेड असल्याचे सांगितले. तुम्हाला ‘कौन बनेगा करोडपती’ मधून २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. ही रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी तुम्हाला अगोदर टॅक्स भरावा लागेल व इतर बाबींची पूर्तता करावी लागेल, असे सांगितले. प्रत्यक्षात या महिलेने कोणतीही कधी लॉटरी काढली नव्हती. २५ लाख रुपये मिळणार हे समजल्यावर या महिलेने ते म्हणतील, त्यानुसार बँकेत पैसे भरायला सुरुवात केली. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांच्याशी सायबर चोरटे संपर्क साधून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे भरायला भाग पाडत होते. ४ लाख १५ हजार रुपये भरल्यानंतरही आपल्याला लॉटरीचे पैसे मिळत नसल्याचे समजल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अलंकार पोलीस अधिक तपास करीत आहेत.