क्रेडिट कार्ड लिमिटच्या बहाण्याने ४ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 09:40 AM2023-09-25T09:40:11+5:302023-09-25T09:40:35+5:30

तीन महिलांसह सात जणांना बेड्या

4 lakhs extortion on the pretext of credit card limit | क्रेडिट कार्ड लिमिटच्या बहाण्याने ४ लाखांचा गंडा

क्रेडिट कार्ड लिमिटच्या बहाण्याने ४ लाखांचा गंडा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  गृहकर्जासह क्रेडिट कार्ड देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने पर्दाफाश करत, तीन महिलांसह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप मौर्या, अब्दुल शेख, कादर परमार, जगदीश जामखंडेकर, मीनाक्षी शिरधनकर, सुषमा ऊर्फ शिल्पा मोहिते आणि मंजू गायकवाड अशी अटक आरोपींची नावे आहेत. 

फसवणूक झालेल्या तक्रारदार यांना त्यांच्या आजारी मुलीच्या उपचारासाठी पैशांची गरज होती. गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांची प्रदीप मौर्याशी ओळख झाली. त्याने तक्रारदारास कर्जासह अधिक मर्यादा असणारे  क्रेडिट कार्ड मिळवून देण्याचे आमिष दाखवत जाळ्यात ओढले. त्यासाठी मौर्या आणि त्याच्या साथीदारांनी तक्रारदार यांच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपये उकळले. तसेच, आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांची फसवणूक केली. आग्रीपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने तपास सुरू केला. आरोपींचा माग काढत गुन्हे शाखेने भांडुप, मुलुंड, कुर्ला, वडाळा परिसरांतून या कटातील मुख्य आरोपी प्रदीप मौर्या याच्यासह अन्य सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून ६० हजार रुपयांच्या रोख रकमेसह विविध ग्राहकांचे आधारकार्ड, डेबिट कार्ड, रबरी शिक्के, सिमकार्ड आणि नऊ मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला आहे. मौर्या हा मुख्य आरोपी असून त्याच्याविरुद्ध गुन्हे शाखा, रबाळे पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे आहेत.
 त्याच्या अटकेने फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या गुन्ह्यात भावना उत्तेकर नावाच्या महिलेसह आणखी काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

अशी करायचे फसवणूक
गृहकर्जासह क्रेडिट कार्ड देण्याचे आमिष दाखवून ते त्यांच्याकडून त्यांच्या कागदपत्रांसह कमिशन म्हणून काही रक्कम घेत होते. क्रेडिट कार्ड प्राप्त झाल्यानंतर ते त्याचा वापर स्वत:साठी करत होते. त्यासाठी आरोपींनी एक स्वाइप मशिन खरेदी केल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. 

Web Title: 4 lakhs extortion on the pretext of credit card limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.