क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक पडली ४ लाखांना, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 09:16 AM2022-07-25T09:16:19+5:302022-07-25T09:16:52+5:30
कुर्ला पूर्वेकडील नेहरूनगर परिसरात राहणारा आदित्य (वय २१) विद्यार्थी आहे. त्याचे वडील परदेशात नोकरी करतात.
मुंबई : क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तरुणाकडून ३ लाख ९९ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कुर्ला पूर्वेकडील नेहरूनगर परिसरात राहणारा आदित्य (वय २१) विद्यार्थी आहे. त्याचे वडील परदेशात नोकरी करतात. आदित्यला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची असल्याने त्याने १९ जुलैला गुगलवर याबाबत माहिती शोधली. त्याला दोन कंपन्यांची माहिती आणि रेटिंग चांगले वाटले. त्याने या कंपन्यांच्या संकेतस्थळावर मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी यांची नोंद करून सबस्क्रिप्शन घेतले. त्यानंतर काही वेळातच आदित्यच्या मोबाइलवर एका अनोळखी महिलेने काॅल केला. तिने ऑल इंडिया क्रिप्टो सर्व्हिस लि. या कंपनीतून बोलत असल्याचे सांगत क्रिप्टोतील गुंतवणुकीबद्दल आदित्यला विचारणा केली. आदित्यने होकार देताच तिने कंपनीचे नियम आणि अटी सांगून सुरुवातीला कमीत कमी १२ हजार ६०० रुपये गुंतणूक करण्यास सांगितले. या गुंतवणुकीवर ५ ते १० टक्के मोबदला मिळणार असून सहा महिन्यांसाठी नोंदणीचे ८०० रुपये भरण्यास सांगितले.
आदित्यला आणखी एका महिलेचा काॅल आला. तिनेही क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करायची असल्यास १४, ५०० रुपये गुंतवणूक व नोंदणी फी म्हणून १,०७० रुपये भरण्यास सांगितले. आदित्यने दोन्ही कंपन्यांत पैसे भरताच दोन्हीकडून सुरक्षित ठेव, गुंतवणूक चार्जेस, खात्याची खातरजमा, रिफन्ड चार्ज, होल्ड झालेली रक्कम रिलीज करणे, दंड, नावात बदल करण्याचा चार्ज, करारपत्र चार्ज अशी वेगवेगळी कारणे देत आदित्यकडून ३ लाख ९९ हजार रुपये उकळले. अखेर फसवणूक झाल्याची खात्री पटताच आदित्यने नेहरूनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.