४ महिने प्लॅनिंग, सीक्रेट सिम, सूनेनं प्रियकरासोबत मिळून घडवलं दुहेरी हत्याकांड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 03:23 PM2023-04-12T15:23:01+5:302023-04-12T15:23:40+5:30
जेव्हा पोलिसांनी मोनिकाची चौकशी केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी मोबाईल फोन तपासला.
नवी दिल्ली - शहरातील गोकुलपुरी परिसरात वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली होती. त्याबाबत तपासात मोठा खुलासा झाला आहे. दुहेरी हत्याकांडाच्या आरोपात पोलिसांनी सूनेला अटक केली आहे. सासू-सासऱ्यांमुळे सूनेला तिच्या प्रियकराला भेटता येत नव्हते. त्यामुळे ४ महिन्यापूर्वी महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून वृद्ध जोडप्याच्या हत्येचा कट रचला. प्रियकर आशिषने त्याच्या साथीदारासोबत हे हत्याकांड घडवले. परंतु एक फिचर फोन आणि सीक्रेट सिमकार्डने पोलखोल झाली. सध्या आशिष फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, गोकुलपुरी इथं सोमवारी एका घरात वृद्ध जोडप्याची लुटीनंतर हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी ७.३० वाजता जोडप्याच्या मुलाने पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली. सुरुवातीला हल्लेखोरांनी घराचा दरवाजा न तोडता बाल्कनीतून प्रवेश घेतल्याचं समोर आले. त्यामुळे घरात उपस्थित व्यक्तींवर हत्येचा संशय आला. पोलिसांनी जोडप्याच्या सून आणि मुलाची वेगवेगळी चौकशी केली.
४ महिन्यापूर्वी रचला कट
जेव्हा पोलिसांनी मोनिकाची चौकशी केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी मोबाईल फोन तपासला. तेव्हा आशिष नावाच्या युवकासोबत ती सातत्याने बोलताना आढळली. पोलिसांनी आशिषबाबत विचारले तेव्हा त्याच्याशी जवळीक असल्याचं ती म्हणाली. पोलिसांचा संशय बळावला तेव्हा त्यांनी कसून चौकशी केली तेव्हा मोनिकाने आशिषसोबत मिळून दुहेरी हत्याकांड घडवले हे कबूल केले. २०२० मध्ये फेसबुकवरून आशिषशी मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. मोनिका विवाहित असूनही आशिषला भेटण्यासाठी हॉटेलला जायची. दोघं फोनवरू संवाद साधायचे.
पतीला समजला मोनिकाचा कारनामा
एकेदिवशी मोनिकाचा मोबाईल पतीच्या हाती लागला. त्याने आशिषसोबतचं चॅट वाचले. तेव्हा दोघांचे नाते समोर आले. पती आणि सासू-सासऱ्यांनी तिच्यावर नजर ठेवली. तिला घरातून बाहेर जाण्यास मनाई केली. मोनिकाला स्मार्टफोनऐवजी साधा मोबाईल दिला. सासू-सासऱ्यांमुळे मोनिकाला आशिषला भेटता येत नव्हते. त्यामुळे डिसेंबरपासून या दोघांना वाटेतून हटवण्याचं प्लॅनिंग सुरू झाले.
षडयंत्राप्रमाणे दोघांनी नवीन सिम घेतले. त्यावरून दोघे एकमेकांशी बोलत होते. जेणेकरून दोघांमधील संवाद कुणालाही कळू नये. घटनेच्यादिवशी संध्याकाळी ७ वाजता आशिष त्याच्या साथीदारासह मोनिकाच्या घरी पोहचला. मोनिकाने घरचा दरवाजा उघडून त्यांना आत घेतले. त्यानंतर दोघे घरच्या छतावर लपले. मोनिकाने दोघांच्या जेवणाची व्यवस्था केली. रात्री १०.३० वाजता सर्वजण त्यांच्या खोलीत झोपायला गेले तेव्हा आशिषने मोनिकाच्या नव्या नंबरवर फोन करून तिला खोलीतून बाहेर पडू नको असं सांगितले. आशिष आणि त्याच्या साथीदाराने मिळून जोडप्याची हत्या केली आणि घरात चोरी केली. सोमवारी सकाळी मोनिकाचा पती जेव्हा बाहेर आला त्याने आईवडिलांची हत्या झाल्याचं पाहिले आणि हादरला. त्याने मोनिकाला उठवले त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले.