स्कूल बसनेच घात केला; मुलाच्या मृत्यूनंतर आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:48 PM2022-04-20T12:48:42+5:302022-04-20T12:49:28+5:30
अवघ्या काही सेकंदानंतर त्याठिकाणी पोहचलेल्या आई वडिलांनी मुलगा सिद्धार्थचा किंचाळण्याचा आवाज ऐकला.
गुरुग्राम – कोरोना काळानंतर पुन्हा एकदा शाळा उत्साहात सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्कूल बस, व्हॅनही पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र सोमवारी दिल्लीमध्ये घडलेल्या एका घटनेने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. याठिकाणी शाळकरी मुलाला स्कूल बसनं चिरडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ही बातमी ऐकून दिल्लीच्या गुरुग्राम परिसरात प्रत्येक आई वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या बसमध्ये कंडक्टर नसल्याने ही दुर्घटना झाल्याचं बोललं जात आहे. मुलाला खाली उतरवल्यानंतर ड्रायव्हरनं मागे न पाहता थेट गाडी पुढे नेली. तेव्हा बसचा धक्का लागू मुलगा खाली पडला आणि त्याच्यावरून गाडीचे चाक गेले. या दुर्दैवी घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. मात्र या घटनेनंतर मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.
गुरुग्रामच्या सेक्टर ७८ च्या शिकोहपूर स्टॉपवर ही दुर्घटना घडली. अवघ्या काही सेकंदानंतर त्याठिकाणी पोहचलेल्या मुलाच्या आई वडिलांनी मुलगा सिद्धार्थचा किंचाळण्याचा आवाज ऐकला. ते धावत गेले त्यांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु बस थांबली नाही. जखमी अवस्थेत मुलाला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. संध्याकाळी ५ वाजता या मुलाने अखेरचा श्वास घेतला. मुलाच्या मृत्यूमुळे आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. परंतु मुलगा आता कायमचा दुरावला. या घटनेचा जबाबदार कोण असा संतप्त सवाल प्रत्येक आई वडिलांच्या मनाला पडला आहे.
काय घडलं ‘त्या’ दिवशी?
अलीकडेच सिद्धार्थचा चौथा बर्थ डे झाला होता. तो लिटील वर्ल्ड प्ले स्कूलमध्ये शिकत होता. सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर तो घरी परतत होता. बस त्याच्या घराजवळ थांबली, तेव्हा मुलगा खाली उतरत होता तितक्यात बस चालकाने मागे वळून न पाहता गाडी पुढे नेली. दररोज १.३० वाजता गाडी बसस्टॉपवर येते परंतु त्यादिवशी गाडी १० मिनिटं लवकर आली होती. जखमी अवस्थेत पालकांनी मुलाला हॉस्पिटलला नेले त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालावली. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये कंडक्टर असता तर कदाचित सिद्धार्थ आज जिवंत असता. मात्र तो नव्हता आणि बसचालकाने हलगर्जीपणा केला.
काय आहे नियम?
अनेक वेळा पालक मुलाला घेण्यासाठी उशिरा पोहोचल्याचेही दिसून येते. बसमधून उतरल्यानंतर मुलाला पालकांच्या ताब्यात द्यावे, असा नियम असला, तरी तसे होत नाही. जर पालक स्टॉपवर पोहोचले नाहीत तर त्यांना बोलावून घ्या आणि जर बस आधी आली असेल तर त्यांनी त्यांच्या वेळेपर्यंत तिथेच थांबावे. पालक आल्याशिवाय मुलाला रस्त्यावर सोडू नये. ४० किमी प्रतितास वेगाचे पालन करण्यासाठी स्पीड गव्हर्नर बसवण्याचा नियम आहे. तरीही शालेय वाहनात त्याची तपासणी केली जात नाही.