संतापजनक! पाळणाघरातील ४ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; नराधम अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 09:40 PM2019-10-02T21:40:35+5:302019-10-02T21:42:27+5:30
5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश
ठाणे - पाळणाघरातील एका चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दशरथ कांबळे (42) या सुरक्षा रक्षकाला बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर पोलिसांनीअटक केली आहे. त्याला 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने ठाणे शहरात संताप व्यक्त होत आहे.
ही चार वर्षांची मुलगी यशोधननगर भागातील एका पाळणाघरात असताना एका बँकेच्या एटीएम केंद्रामध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या कांबळे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना 29 सप्टेंबर 2019 रोजी घडली. रविवारी सकाळी या मुलीच्या आईने तिला नेहमीच्या पाळणाघरात नेऊन सोडले आणि ती कामाला निघून गेली. कांबळे हा तिथून जवळच असलेल्या एक एटीएम केंद्रामध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. तो या पाळणाघरात आला आणि गंमत दाखवतो, तुझा अभ्यास घेतो, असे अमिष दाखवून तिला आपल्याबरोबर यायला सांगितले. ती त्याच्या मागे गेली तेव्हा त्याने तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. संध्याकाळी आईबरोबर घरी गेली तेव्हा ती घाबरलेली होती. आईला तिच्या वागण्यात बदल जाणवला. तिने विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा तिने आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. तेव्हा तिच्या आईने याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ठाणे पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली. पुढचा तपास पोलीस करत आहेत. पण या घटनेमुळे ठाण्याच्या यशोधन नगर परिसरात खळबळ उडाली आहे.