पैसे उकळण्याच्या उद्देशाने ४ वर्षीय मुलाचे अपहरण; मुंबईहून युपीला नेण्याचा कट पोलिसांनी उधळला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 09:43 PM2021-11-09T21:43:30+5:302021-11-09T21:45:30+5:30
Kidnapping Case : अपहरण झालेला मुलाला सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पैसे उकळविण्याच्या उद्देशाने चार वर्षाच्या मुलाचे अपहरण करून केले. तसेच त्याला मुंबईवरून पळवून नेण्याच्या बेतात असलेल्या अपहरणकर्त्याला नाशिकरोड पोलिसांनी मुलासह शिताफीने ताब्यात घेऊन उधळला आहे. अपहरण झालेला मुलाला सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
८ नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ठक्कर बाप्पा कॉलनी, इंदिरा नगर, चेंबूर, मुंबई येथून चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. या प्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाणे मुंबई या ठिकाणी भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हा चार वर्षाच्या मुलाला घेऊन मुंबईहून रेल्वेने नाशिकच्या दिशेने गेला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी समजल्यानंतर त्यांनी तत्काळ त्या दिशेच्या सर्व पोलिस स्टेशन व वरिष्ठ अधिकार्यांना कळविली. अपहरणकर्ता ४ वर्षाच्या मुलाला घेऊन नाशिकरोड परिसरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी स्वतः लक्ष घालून पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना सूचना दिल्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी तत्काळ नाशिकरोड पोलिस ठाण्याचे विशेष पथक तयार करून रेल्वे स्टेशन, बसस्थानक व इतर ठिकाणी पाठवले. या पथकातील पोलीस अमलदार कैलास थोरात यांना गोपनीय माहिती मिळाली की, देवी चौक येथे अनोळखी इसम लहान मुलास घेऊन संशयित रित्या फिरत आहे. ही माहिती मिळताच व.पो.नि शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर, पोलीस कर्मचारी विशाल पाटील, राकेश बोडके, निलेश विखे यांनी देवी चौक परिसरात चार वर्षीय मुलाला घेऊन फिरणाऱ्या रामपाल उदयभान तिवारी (रा. बसंतपुरराजा, उत्तर प्रदेश) यास देवीचौक, सराफ बाजार येथून ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने चार वर्षाच्या मुलाच्या आई-वडिलांकडून 50 हजार रुपये मिळवण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केल्याचे कबूल केले. तसेच तो त्या बालकाला घेऊन उत्तर प्रदेश येथे जाणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. मुंबईवरून पोलीस हवालदार सुनील भोसले आणि अजित कावळे, अपहरण झालेल्या मुलाचे वडील यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली व अपहरण झालेल्या चार वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले. यावेळी अपहरण झालेल्या मुलाचे वडील चार वर्षाच्या मुलाला जवळ घेऊन ओक्साबोक्शी रडू लागले.
नाशिकरोड पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार वर्षाच्या मुलाचे अपहरण करणारा गजाआड केला गेला. या उल्लेखनीय कामगिरीचे पोलीस आयुक्त दीपक पांडये, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ यांनी कौतुक केले. या गुन्ह्यातील संशयित व अपहरण झालेल्या चार वर्षाच्या मुलाला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.