४० लाख मागितले, लग्न मोडले; मुलीच्या वडिलांची पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:14 AM2024-01-15T11:14:47+5:302024-01-15T11:15:06+5:30
मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेताच अदिल शेख आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
मुंबई : साखरपुडा थाटामाटात उरकला. लग्नाची तारीख ठरली. पत्रिका छापल्या. हॉल बुक झाला. सर्व तयारी अंतिम टप्प्यात असतानाच मुलाकडून ४० लाख आणि महागड्या कारचा हुंड्यासाठी लग्नास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार वर्सोवामध्ये समोर आला. अखेर, मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेताच अदिल शेख आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
वर्सोवा परिसरात तक्रारदार राहण्यास आहेत. ते हेअर आर्टिस्ट आहेत. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. मुलीच्या विवाहासाठी मीरा रोडचे अदिल इक्बाल शेखचे स्थळ आले. मुलगा चांगला नोकरीला असल्याने कुटुंबीयांनी साखरपुडा उरला. साखरपुड्यात ५०० लोकांसाठी जेवण ठेवले होते. जवळपास १५ लाखांचा खर्च केला.
९ फेब्रुवारी रोजी लग्नाची तारीख ठरली. मात्र, साखरपुड्यानंतर डिसेंबर महिन्यात शेख कुटुंबीय घरी आले. त्यांनी, सुरुवातीला हुंडा घेणार नाही स्वखुशीने जे द्यायचे ते देण्यास सांगून निघून गेले. त्यानंतर, घराचे नूतनीकरण करायचे आहे असे सांगून पैशांची मागणी केली.
त्यांनी सव्वादोन लाख रुपये दिले. पुढे आणखीन पैशांची मागणी झाली. त्यानुसार त्यांनी ४ लाख १५ हजार रुपये दिले. पुढेही वेळोवेळी गोष्टींसाठी पैसे दिले. त्यानंतर, शेख कुटुंबीयांनी ४० लाख हुंडा आणि कारची मागणी केली. इथे मुलीच्या लग्नपत्रिका छापल्या. हॉल बुक झाला, कपडे, दागिने खरेदी झाले. मात्र, शेख कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिला. अखेर, शेख कुटुंबीयांनी फसवणूक केल्याने मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली.