पाकिस्तानच्या बोटीतून आलेले ४०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त; सात जणांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 06:29 AM2021-12-21T06:29:23+5:302021-12-21T06:30:15+5:30
भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या एका पाकिस्तानी बोटीतून ७७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या एका पाकिस्तानी बोटीतून ७७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. या हेरॉइनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४०० कोटी रुपये आहे. अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी पाकिस्तानी बोटीतील सात जणांना अटक करण्यात आली.
भारतीय तटरक्षक दल (कोस्टगार्ड) व गुजरात पोलिसांचे दहशतवादी पथक (एटीएस) यांनी ही संयुक्त कारवाई केली. हेरॉइनची तस्करी करण्यासाठी वापरलेल्या पाकिस्तानी बोटीचे नाव अल् हुसैनी असे आहे. अमली पदार्थांची पाकिस्तानद्वारे तस्करी करण्यासाठी गुजरातच्या सागरी हद्दीचा सर्रास वापर करण्यात येतो. त्यासाठी या तस्करांचे भारतातील हस्तक त्यांना मदत करतात. गुजरातमधील मोरबी येथे पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात छापा मारून १२० किलो हेरॉइन जप्त केले होते. त्या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी अटक केली. हे अमली पदार्थ इराणमार्गे पाकिस्तानात व तिथून गुजरातच्या सागरी हद्दीतून अमेरिका व अन्य देशांमध्ये पाठविण्यात येणार होते. मात्र या तस्कराच्या भारतातील हस्तकांनी हे अमली पदार्थ आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. ते त्यांनी भारतातच विकायचे असे ठरविले होते, अशी माहिती तपासातून उघड झाली होती.
अमली पदार्थांच्या तस्करी व व्यापारासाठी गुजरातच्या सागरी हद्दीचा पाकिस्तानकडून होत असलेला वापर रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दल व गुजरात एटीएसने अनेक उपाययोजना केल्या. या सागरी हद्दीत शेकडो बोटी असतात. त्यातील प्रत्येक बोटीची तपासणी करणे शक्य होत नाही. मात्र या प्रदेशातून होणारी अमली पदार्थांची तस्करी कमी करण्यात भारताला यश आले आहे.
दहशतवादी हल्ले टाळण्यासाठीही सतर्क
२००८ साली पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गेच भारतात प्रवेश करून मुंबईवर भीषण हल्ला केला होता. तसा काही प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी गुजरातच्या सागरी हद्दीत भारतीय तटरक्षक दल सतर्क असते. भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या अनेक पाकिस्तानी मच्छीमार, तस्करांना पकडण्यात येते.