मुकेश अंबानी यांच्याकडे मागितले ४०० कोटी; ई-मेलद्वारे धमक्याचे सत्र सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 11:50 AM2023-10-31T11:50:40+5:302023-10-31T11:52:34+5:30
पहिला धमकीचा ई-मेल २७ ऑक्टोबर रोजी आला होता
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना धमक्यांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी रात्री पुन्हा एकदा त्यांना ई-मेलद्वारे धमकावण्यात आले. आता त्यांच्याकडे ४०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांना धमकावणारा पहिला ई-मेल आला त्यावेळी त्यांच्याकडे २० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यास उत्तर न दिल्याने २०० कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, सोमवारच्या ई-मेलमध्ये त्यात वाढ करून ४०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
आमचा एक शूटर...
- ई-मेल करणाऱ्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. माझा माग पोलिस काढू शकत नाहीत. त्यामुळे ते मला अटक करू शकत नाही. सबब तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरी तुम्हाला मारण्यास काहीच हरकत नाही. आमचा एक शूटर हे काम करू शकतो, असे ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
- अंबानी यांना पहिला धमकीचा ई-मेल २७ ऑक्टोबर रोजी आला होता. या धमकीच्या ई-मेलनंतर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. त्यापाठोपाठ तिसरा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. हे मेल परदेशातून येत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिस तपास करीत आहे.