Crime News | मुरूम वाहतुकदारांकडून ४० हजारांची लाच, दोन तलाठ्यांसह मध्यस्थ ACBच्या जाळ्यात
By बापू सोळुंके | Published: December 30, 2022 11:54 PM2022-12-30T23:54:35+5:302022-12-30T23:55:01+5:30
'फोन पे'द्वारे घेतली दहा हजार रुपये लाच
बापू सोळुंके, औरंगाबाद: मुरूम,खडी वाहतुकदाराच्या हायवा वर कारवाई न करण्यासाठी ४० हजार रुपये लाच घेताना दोन तलाठ्यांसह खाजगी मध्यस्थांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात लाचखोरांविरोधात गुन्हा नोंदिवण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. तलाठी ज्ञानेश्वर महालकर (५२,नेमणूक रांजणगाव खुरी, ता. पैठण ),तलाठी देविदास बनाईत (५४, नेमणूक- मुलाणी वडगाव व लोहगाव, ता. पैठण) आणि मध्यस्थ खाजगी व्यक्ती शिवाजी इथापे (४०)अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
या कारवाई विषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, याप्रकरणातील तक्रारदार हे हायवा मालक असून ते मुरूम आणि खडी वाहतूक करण्याचा व्यवसाय करतात. यादरम्यान २९ डिसेंबर रोजी तलाठी महालकर याने तक्रारदार यांची भेट घेतली. तेव्हा त्यांच्या हद्दीतून गौण खनिजाची सुरळीत वाहतूक सुरू ठेवण्यासाठी स्वत:साठी ३० हजार रुपये तर मुलाणी वाडगावचे तलाठी देविदास बनाईत करीता ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नाेंदविली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा पंचासमक्ष महालकरने स्वत:साठी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. एवढेच नव्हे तर बनाईत यास फोन करून त्याच्यासाठी ४० हजार रुपये तक्रारदाराकडे मागितल्याचे कळविले. लाचखोरांना पकडण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ३० डिसंबर रोजी सापळा रचला असता. तेव्हा आरोपी महालकरने १० हजार रुपये लाच फोन पे वर घेेतली. तर बनाईतच्या सांगण्यावरून मध्यस्थ इथापेने ४० हजार रुपये घेतले.
लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खंबे ,उपअधीक्षक मारोती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता इटूबोने, पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पो.ना. बाळासाहेब राठोड, पो. ना. विलास चव्हाण यांनी केली. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.