औरंगाबादेतील ३४ मका व्यापाऱ्यांना ४२ कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 05:40 PM2019-12-04T17:40:09+5:302019-12-04T17:47:46+5:30
कोल्हापूरच्या कंपनीविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : मोंढ्यातील ३४ व्यापाऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर त्यांचे पैसे न देता ४२ कोटी ११ लाख १७ हजार १९९ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याविषयी व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून इचलकरंजीच्या (जि.कोल्हापूर) कंपनीविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
ट्रेडको इंडिया प्रा.लि. कंपनीचा मालक राजरतन अग्रवाल आणि संचालिका निधी अग्रवाल यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. शाहनूरवाडी येथील रहिवासी पंकज धन्नालाल चुडीवाल (४३) हे मोंढ्यातीलच आस्था कॉर्पोरेशनमार्फत आरोपींच्या कंपनीला ६५ ते ७५ दिवसांत मालाचे पैसे मिळण्याच्या अटीवर माल पाठवितात. नेहमीप्रमाणे १२ जून २०१८ ते २६ आॅगस्ट २०१८ या कालावधीत पंकज चुडीवाल आणि त्यांचा भाऊ पवन यांनी आरोपीची कंपनी असलेल्या श्री हॉनेस्ट डेरिव्हेटिव्ह (दाभाडी, जामनेर, जि. जवळगाव) आणि श्री ट्रेडको डिसान प्रा.लि., देवपूर रोड, धुळे या कंपन्यांना ३५ लाख ६३ हजार ७८० रुपये किमतीची मका पाठविला होता. पैसे मिळण्याची मुदत संपल्यानंतरही कंपनीकडून पैसे न मिळाल्याने पंकज, त्यांचा भाऊ पवन आणि आणखी एक व्यापारी मनोज कासलीवाल हे पैसे आणण्यासाठी इचलकरंजी येथे जाऊन अग्रवाल याला भेटले.
यावेळी अग्रवालने पंकज आणि अन्य व्यापाऱ्यांना सांगितले की, त्यांची कंपनी सध्या विस्तार करीत आहे. अनेक व्यापाऱ्यांच्या मक्याचे पैसे देणे आहेत. देणे असलेली रक्कम १८० दिवस माझ्या कंपनीकडे मुदत ठेव म्हणून ठेवल्यास मी १५ टक्के व्याजदराने परतावा देईल. ही रक्कम मुदत कराराच्या तारखेपासून धरली जाईल आणि मुदत संपताच व्याजासह ६ लाख ६६ हजार १६० रुपयांचा धनादेश तयार असेल, असे सांगितले. १५ टक्के व्याजदराने परतावा मिळत असल्याने पंकज आणि अन्य व्यापाऱ्यांनी त्यास होकार दिला. त्यांच्यासारखेच सतीश लड्डा, सुनील पाटणी, विजय चिंचोले, मनोज सिसोदिया, संजय सिसोदिया, विजय बोरा आदी व्यापारी तेथे उपस्थित होते. त्यांची रक्कमही त्याने मुदत ठेव म्हणून ठेवून घेतली. तक्रारदारासह अन्य ३४ व्यापाऱ्यांच्या मालाचे एकूण ४२ कोटी ११ लाख १७ हजार १९९ रुपये आरोपींकडे बाकी असल्याचे समजले.
मुदतीनंतरही पैसे परत करण्यास टाळाटाळ
मुदत ठेवीची सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर पैसे न मिळाल्याने तक्रारदार चुडीवाल आणि अन्य व्यापाऱ्यांनी आरोपींची इचलकरंजी येथे जाऊन भेट घेतली असता त्यांचे कर्ज प्रकरण सुरू असून, अवघ्या काही दिवसांत कर्जाची रक्कम प्राप्त होताच आरटीजीएसद्वारे तुमच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाईल, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. तक्रारदारांनी त्याच्याकडे धनादेशची मागणी केल्यानंतर त्याने धनादेश देण्यास नकार दिला. शिवाय त्याने सांगितल्याप्रमाणे कोणाच्याही खात्यावर त्याने आरटीईजीएसद्वारे पैसे जमा केले नाहीत. आरोपींनी आपल्यासह ३४ व्यापाऱ्यांची ४२ कोटी ११ लाख १७ हजार १९९ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार चुडीवाल यांनी पोलीस आयुक्तांकडे नोंदविली. आयुक्तांच्या आदेशाने याविषयी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.